‘आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत’, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अतुल कुलकर्णींची खास पोस्ट

NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिनेते अतुल कुलकर्णींचा ठाम पाठिंबा. फेसबुकवर शेअर केली पोस्ट. अनेकजण करत आहेत कौतुक.

आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अतुल कुलकर्णींची खास पोस्ट
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 24, 2026 | 7:13 PM

NEET पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला उघडपणे समर्थन देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मांडली आहे.

सामाजिक प्रश्नांवर सातत्याने भाष्य करणारे अतुल कुलकर्णी यांनी यावेळी देशातील युवा पिढीचे कौतुक करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून अनेकांनी त्यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

अतुल कुलकर्णी यांच्या पोस्टमध्ये काय?

अतुल कुलकर्णी म्हणतात की, ‘आजच्या पिढीने गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुन्हा जिवंत केले आहे. आमच्या आणि आमच्या आधीच्या पिढ्यांनी त्यांच्या नावांचा सतत उल्लेख केला, पण त्यांच्या विचारांचे आचरण मात्र आपण विसरत गेलो. शिक्षण, समाज, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांत आपणच आजच्या परिस्थितीस कारणीभूत ठरलो आहोत. आता तरी जबाबदारी स्वीकारून या तरुणांच्या संघर्षाला पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे.’

या पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या विचारांचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अधिकाधिक पाठिंबा देण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

यापूर्वीही अतुल कुलकर्णी यांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. एका हिंदी कवितेच्या माध्यमातून त्यांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना थेट प्रश्न विचारत व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर भाष्य केले होते. ‘बीस जुलाई की अगली सुबह…’ या कवितेद्वारे त्यांनी नागरिकांनी अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज अधोरेखित केली होती.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने स्पष्ट भूमिका

अतुल कुलकर्णींसारख्या संवेदनशील आणि अभ्यासू अभिनेत्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही या आंदोलनाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी अधिक तीव्र होताना दिसत आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नावर सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि परीक्षापद्धतीवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांसह अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us