Prakash Raj: ‘हा विश्वासघात नाही का?’ डिलिमिटेशन बिलाविषयी द्रमुकच्या निर्णयावर प्रकाश राज यांचा थेट सवाल
Prakash Raj on DMK Delimitation Bill 2026: मतदारसंघ पुनर्रचना बिलाविषयी द्रमुकच्या भूमिकेवर अभिनेता प्रकाश राज यांनी संताप व्यक्त केला आहे. 'हा विश्वासघात नाही का?' असा थेट सवालच त्यांनी पक्षाला केला आहे.

Prakash Raj on DMK Delimitation Bill 2026: संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना बिलाला पाठिंबा देणाऱ्यावरून भारतातील दक्षिणेतील राज्यात गदारोळ उठला आहे. महाराष्ट्रापासून ते पार तामिळनाडूपर्यंत इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी भूमिका बदलली आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम(DMK) या पक्षाच्या बदलेल्या भूमिकेने अनेका धक्का बसला आहे. अभिनेत प्रकाश राज यांनी या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना त्यांनी ‘हा विश्वासघात नाही का?’ असा थेट सवाल केला आहे. तसेच या विधेयकाला दिलेल्या पाठिंब्यावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.
प्रकाश राज यांची तिखट प्रतिक्रिया
समाज माध्यमावर प्रकाश राज व्यक्त झाले. त्यांनी द्रमुकला त्यांच्या अगोदरच्या भूमिकेची आठवण करून दिली. द्रमुकने अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर गंभीर चिंता व्यक्त केली होती. हे विधेयक अत्यंत धोकादायक असतानाही द्रमुक पाठिंबा कसा देऊ शकतो असा रोकडा सवाल प्रकाश राज यांनी केला आहे. हा एक स्वार्थीपणाचा निर्णय आहे. हा जनतेशी विश्वासघात आहे, असा आरोप अभिनेत्याने केला आहे. तर अजूनही वेळ गेलेली नाही, द्रमुकने त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. विधेयकाला दिलेला पाठिंबा मागे घ्यावा अशी जोरदार मागणी प्रकाश राज यांनी केली आहे.
खासदार कनिमोझी यांची विधेयकावर प्रतिक्रिया
तर दुसरीकडे डिलिमिटेशन बिलावर द्रमुकच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. खासदार कनिमोझी यांनी त्यानंतर माध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. द्रमुकने आपली भूमिका बदलेली नाही. पक्ष नेहमीच निष्पक्ष मतदारसंघ पुनर्रचनेच्या मागणीवर ठाम होता आणि आहे. डिलिमिटेशन रोखण्याऐवजी तामिळनाडूचे कोणतेही नुकसान होऊ नये, हाच पक्षाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या प्रस्तावित डिलिमिटेशन विधेयकात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. काही दाव्यानुसार, या विधेयकात अखंड भारत, पाकव्याप्त काश्मीरचाही उल्लेख आहे. या बिलामुळे लोकसभेतील संख्याबळ 543 वरून 815 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. खासदार आणि आमदार यामुळे वाढतीलच, तर महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. या बिलाच्या मसुद्दावरून राजकीय पक्षांमध्ये जुंपली आहे. काँग्रेसने या बिलाला तीव्र विरोध केला आहे. तर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी एनडीएची बाजू घेतल्याने त्या त्या राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे.