देशात पेट्रोल, डिझेल अन् खतांचा पुरेसा साठा, IGoM च्या बैठकीतून नागरिकांना मोठा दिलासा, साठेबाजी न करण्याचं आवाहन
आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील अनौपचारिक मंत्रीगटाची (IGoM) ची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतावर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेण्यात आला आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जगातील अनेक देशांमध्ये सध्या मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. तसेच खतांचा देखील तुटवडा जणावत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील अनौपचारिक मंत्रीगटाची (IGoM) ची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतावर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच भारतामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या जीवानवश्यक वस्तुंचा साठा आणि सरकारच्या उपाययोजना यावर देखील चर्चा करण्यात आली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबतच मंत्री जगत प्रकाश नड्डा, मनोहर लाल, हरदीप सिंह पुरी, प्रल्हाद जोशी, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू सर्बानंद सोनोवाल, या मंत्र्यांसह इतरही काही मंत्र्यांची उपस्थिती होती.
आयजीओएमकडून देशात उपलब्ध असलेल्या अत्यावश्यक वस्तूंचा साठा तसचे मागणी याचा आढावा घेण्यात आला. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. सध्या देशातील पुरवठ्याची स्थिती सामान्य आहे. चिंतेचा कोणताही विषय नाही.
अत्यावश्यक वस्तूंचा साठा कमी पडणार नाही याची सरकार पूर्णपणे काळजी घेत आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊन अतिरिक्त पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजी गॅसचा साठा करून ठेवू नये, असं आवाहान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कणखर नेतृत्व आणि दूरदृष्टीमुळे या जागतिक संकटाचा भारताला फार थोडा फटका बसला आहे, असंही यावेळी राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.
यावेळी माहिती देताना आयजीओएमकडून स्पष्ट करण्यात आलं की देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा पेट्रोलियम पदार्थांचा उत्पादक देश आहे. भारताची क्षमता ही 258.1 दसलक्ष टन प्रतिवर्ष एवढी आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये 243.2 दसलक्ष टन एवढा देशांतर्गत वापर होता, आपण दरवर्षी सरासरी 61.5 दसलक्ष टन एवढ्या पेट्रोलियम पदार्थांची निर्यात जगाला करतो. सध्याच्या स्थितीमध्ये पुरवठ्यात कोणतीही तूट नाहीये.
खताचाही पुरेसा साठा उपलब्ध
मध्यपूर्वेत सध्या संघर्ष सुरू आहे, त्यामुळे देशात खरीप हंगामात खतसाठा कमी पडू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आयजीओएमकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. देशात सध्या स्थितीमध्ये खतांचा समाधानकारक साठा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 2026 साठी 290. 54 लाख मेट्रिक टन खताची गरज लागू शकते असा अंदाज कृषी व शेतकरी कल्याण विभागानं वर्तवला आहे. भारताने मे आणि जून महिन्यांमध्ये भारतीय बंदरांवर दाखल होणाऱ्या खतांच्या साठ्यातून अंदाजे 15 लाख मेट्रिक टन डीएपी, आणि 10 लाख मेट्रिक टन एनपीके खतं सुरक्षित केल्याची माहिती देखील या बैठकीत देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या स्थितीमध्ये देशात खताचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, घाबरण्याचं कारण नाही, असं आवाहानही या बैठकीतून करण्यात आलं.