
अहमदाबादहून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळून तब्बल 265 लोकांचा मृत्यू झाला. यात 241 प्रवासी तर 24 विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विमानाने टेकऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी असलेल्या एका मेडिकल हॉस्टेलजवळ कोसळलं. या विमानात २३० प्रवासी, २ पायलट आणि १० कर्मचारी होते. या भीषण दुर्घटनेत १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केल्या जात आहेत. तर दुसरीकडे हे मृतदेह कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २०० हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने शवपेटी बनवण्यासाठीच्या ऑर्डर दिल्या आहेत. ज्या व्यक्तीला ही शवपेटी बनवण्याची ऑर्डर देण्यात आली, त्यांच्यासोबत फोनवर संवादाची माहिती समोर आली आहे.
एजन्सीच्या रिपोर्टनुसार, एअर इंडियाने वडोदरामधील शवपेटी बनवणाऱ्या नेल्विन रजवाडी यांना शवपेटीची ऑर्डर दिली आहे. एअर इंडियाने अचानक फोन करून १०० शवपेट्या बनवण्याची ऑर्डर तातडीने देण्यात आली. “शुक्रवारी रात्री ८:३० वाजता ‘एअर इंडिया’च्या एका व्यवस्थापकाचा फोन आला. त्यांनी मला तातडीने १०० शवपेट्या हव्या आहेत, असे सांगितले. एकाच वेळी इतक्या शवपेटी बनवणे खूप कठीण होते. पण आम्ही कोणताही विलंब न करता काम सुरू केले.” अशी माहिती नेल्विन रजवाडी यांनी दिली.
शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून नेल्विन आणि त्यांची टीम न थांबता शवपेट्या बनवण्याच्या कामात गुंतली आहे. मेथोडिस्ट चर्चच्या फादरकडून मृतदेहांच्या विधींसाठी जागा, पांढरे कपडे यांसारखे आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. नेल्विन गेल्या ३० वर्षांपासून हे काम करत आहे. ते ऑल इंडिया ॲम्ब्युलन्स सेवा देखील चालवतात. या प्रसंगावर भाष्य करताना नेल्विन म्हणाले, “एक साधी काडी जरी टोचली तरी पाच दिवस दुखते. मग ज्या कुटुंबांनी आपले आप्त गमावले आहेत, त्यांच्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पनाच करवत नाही.”
आतापर्यंत आम्ही २५ शवपेट्या तयार केल्या आहेत. या सर्व शवपेट्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवल्या जात आहेत. उर्वरित शवपेट्याही लवकरच तयार होतील, असे नेल्विन यांनी सांगितले. हे काम माणुसकी आणि देशभक्तीशी संबंधित आहे. या कामात अनेक लोक अहोरात्र गुंतले आहेत, असे नेल्विन रजवाडींनी म्हटले.