अमृतसरला जायचं होतं पण पोहोचलं पाकिस्तानला, Air India ची फ्लाईट रस्ताच चुकली; हवेत नेमकं काय घडलं?
एअर इंडियाचे एक विमान दिल्लीहून उड्डाण करते आणि अमृतसरमध्ये उतरणार असते पण वैमानिकाच्या लक्षात येते की तो प्रत्यक्षात लाहोरमध्ये आहे. आता यानंतर काय घडलं ते पाहा....

एअर इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आहे. गेल्या सोमवारी रात्री दिल्लीहून अमृतसरसाठी एक विमान निघाले होते. विमानात 200 हून अधिक प्रवासी होते. मात्र, अमृतसरला पोहोचण्याऐवजी विमान लाहोरला वळवण्यात आले. आपण पाकिस्तानात असल्याचे कळताच त्यांनी यू-टर्न घेतला. ही घटना 22 जून रोजी रात्री उशिरा घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे एआय-479 हे विमान सोमवारी रात्री सुमारे 9:15 वाजता दिल्ली विमानतळावरून अमृतसर विमानतळासाठी निघाले. अमृतसर विमानतळावर पोहोचल्यानंतर विमान तिथे उतरले नाही. हवेत अनेक वेळा घिरट्या घातल्यानंतर, अमृतसर विमानतळावर उतरण्याऐवजी विमान पाकिस्तानी हवाई क्षेत्रात शिरले. या घटनेबाबत एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
विमान लाहोरला पोहोचले का?
सूत्रांनुसार, एअर इंडियाचे हे विमान केवळ पाकिस्तानी हवाई क्षेत्रात शिरलेच नाही, तर ते लाहोरला पोहोचलेही. त्यावेळी आपण पाकिस्तानी हवाई क्षेत्रात शिरलो आहोत, हे वैमानिकाच्या लक्षात आले नाही. जेव्हा पाकिस्तानमधील लाहोर एटीसीने एअर इंडियाच्या विमानाशी संपर्क साधून ते भारताच्या नव्हे, तर पाकिस्तानी हवाई क्षेत्रात असल्याचे कळवले, तेव्हा वैमानिकाला ही गोष्ट समजली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या वैमानिकाने स्पष्ट केले की, तो चुकून पाकिस्तानी हवाई क्षेत्रात शिरला होता. त्यानंतर वैमानिकाने यू-टर्न घेतला आणि तो अमृतसरच्या दिशेने निघाला. परंतु त्याला अमृतसरमध्ये उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. अमृतसरहून त्याला दिल्लीला परतावे लागले.
अमृतसरसाठी उड्डाण
दिल्लीत पोहोचल्यानंतर, रात्री 1 वाजल्यानंतर विमान पुन्हा अमृतसरकडे वळवण्यात आले. खराब हवामान असल्यामुळे रस्ता चुकला असावा, तांत्रिक बिघाड झाला, की वैमानिक चुकून मार्ग चुकला आणि पाकिस्तानी हवाई क्षेत्रात शिरला, हे अद्याप समजलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे प्रवाशांना सुमारे चार तासांचा विलंब झाला. अमृतसरमध्ये नियोजित वेळेला उड्डाण चुकलेले विमान अखेर बुधवारी सकाळी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचले. हवाई वाहतूक अधिकारी संपूर्ण घटनेचा आढावा घेत असून तांत्रिक बिघाडाच्या कारणाचा तपास करत आहेत.