
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातानंतर एअर इंडिया सातत्याने चर्चेत आहे. आतापर्यंत एअर इंडियाच्या अनेक फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग, तर कधी तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच आता बुधवार 19 जून रोजी एअर इंडिया एअरलाइनने आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे रद्द झालेल्या किंवा कमी केलेल्या उड्डाणांची माहिती एअरलाइनने जाहीर केली आहे.
एअर इंडियाने 21 जून ते 15 जुलै 2025 या कालावधीत तीन आंतरराष्ट्रीय मार्गांवरील आपली उड्डाणे पूर्णपणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, आणखी 16 मार्गांवरील सेवांमध्ये कपात केली आहे, असे स्पष्ट केले आहे.
एअर इंडियाने याबद्दल एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, या निर्णयामागे उड्डाणांचे वेळापत्रक सुव्यवस्थित करणे. प्रवाशांची शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळणे हा उद्देश आहे. एअर इंडिया एअरलाइनने हे देखील स्पष्ट केले की हा एक तात्पुरता निर्णय आहे. हा निर्णय 15 जुलैपर्यंत लागू राहील. यानंतर ही उड्डाणे पुन्हा सुरू केली जातील.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आदेशापर्यंत तीन मार्गांवरील उड्डाणे पूर्णपणे निलंबित करण्यात आली आहेत. यामध्ये दिल्ली-नैरोबी, अमृतसर-लंडन (गॅटविक) आणि गोवा (मोपा)-लंडन (गॅटविक) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि इतर मार्गांवरील 16 आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या कमी करण्यात आली आहे.
एअर इंडिया एअरलाइनने या निर्णयाबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे. तसेच, प्रवाशांना विनामूल्य री-शेड्यूलिंग किंवा संपूर्ण रिफंड घेण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा ही त्यांची आमची पहिली प्राथमिकता आहे, असे एअरलाइनचे म्हणणे आहे. तसेच सर्व ऑपरेशन्स शक्य तितक्या लवकर पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करु, असे एअर इंडियाने म्हटले.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेले एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात 242 लोकांपैकी 241 लोकांचा मृत्यू झाला होता. केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला होता. या अपघातानंतर एअर इंडियाच्या अनेक विमानाचे आपत्कालीन लँडिंग, तर कधी तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.