
गुजरातच्या अहमदाबाद येथे एक मोठा विमान अपघात घडला आहे. अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अपघाताला बळी पडले. या विमानात 230 प्रवासी, 2 वैमानिक आणि 10 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिक सुमित सभरवाल यांनी मेडे (MAYDAY) कॉल केला होता. टेकऑफनंतर लगेचच त्यांनी हा आपत्कालीन कॉल करून एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ATC कडून प्रत्युत्तर कॉल केला गेला तेव्हा वैमानिक तो घेऊ शकले नाहीत. त्यानंतर काही क्षणांतच विमान कोसळले.
अपघाताची भीषणता
अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान मेघानी नगर परिसरात कोसळले. या विमानात 242 जण होते, ज्यामध्ये 2 वैमानिक आणि 10 क्रू मेंबर्स यांचा समावेश होता. अपघातानंतर विमानाचा ढिगारा जळताना स्पष्टपणे दिसत होता. बचाव आणि मदत पथके जिवंत राहिलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, आणि कोणत्याही प्रवाशाच्या वाचवण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सांगितले जात आहे.
वाचा: मोठी अपडेट! पतीच्या हत्येनंतर सोनम इंदौरला आली, बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये…
बोइंगच्या शेअर्सवर परिणाम
गुरुवारी अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग 787-8 ड्रीमलाइनर विमान कोसळल्यानंतर बोइंग कंपनीच्या शेअर्समध्ये प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. दुपारी 3:31 वाजता बोइंगचे शेअर्स 6.42 टक्क्यांनी घसरून 196.51 डॉलरवर आले. या विमानात 10 क्रू मेंबर्स आणि तीन लहान मुलांसह 242 प्रवासी होते. हा अपघात मेघानी नगर परिसरात टेकऑफदरम्यान घडला. विमान कोसळल्यानंतर घटनास्थळावरून काळा धूर आकाशात उसळताना दिसला, ज्यामुळे या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
एअर इंडियाचे निवेदन
विमान अपघातानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. मात्र, या अपघातामुळे किती जीवित आणि वित्तहानी झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एअर इंडियाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, “फ्लाइट AI171 अहमदाबादहून लंडन गॅटविकला जात होती. आज, 12 जून रोजी त्या विमानाता अपघात झाला. आम्ही सध्या तपासणी करत आहोत आणि याबाबत अधिक माहिती आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि एअर इंडियाच्या वेबसाइटवर शेअर करू.” बोइंग कंपनीची विमाने यापूर्वीही अनेक अपघातांमध्ये सामील झाली आहेत. अलीकडील एक अपघात डिसेंबर 2024 च्या अखेरीस दक्षिण कोरियातील जेजू एअरच्या विमानाचा झाला. ते विमान लँडिंगचा प्रयत्न करताना कोसळले आणि त्यात 179 जणांचा मृत्यू झाला. ते विमान बोइंग 737-800 होते.