एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात कोणत्या देशाचे किती प्रवासी होते? यादी आली समोर

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. या विमानात कोणत्या देशाचे किती प्रवासी प्रवास करत होते ते जाणून घेऊयात.

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात कोणत्या देशाचे किती प्रवासी होते? यादी आली समोर
air india plane crash passangers details
| Updated on: Jun 12, 2025 | 4:33 PM

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. त्यामुळे अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काय सुरु आहे. या अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले जात आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विमानात कोणत्या देशाचे किती प्रवासी प्रवास करत होते ते जाणून घेऊयात.

कोणत्या देशाचे किती प्रवासी?

एअर इंडियाचे हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहानमुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता अशी माहितीही समोर आली आहे.

एअर इंडियाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

एअर इंडियाने सोशल मीडियाद्वारे या अपघाची माहिती दिली आहे. तसेच प्रवाशांसाठी १८०० ५६९१ ४४४ हा हेल्पलाइन क्रमांक देखील सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे आणि एअर इंडिया तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे.

रहिवासी भागात कोसळलं विमान

लंडनला जाणारे विमान ज्या ठिकाणी हे कोसळलं त्या भागात रहिवासी वस्ती आहे. अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळलं आहे. जिथे अपघात झाला, त्याच भागात अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं जात आहे.

५० हून अधिक लोकांच्या मृत्यूची भीती

अहमदाबाद विमान अपघातात ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या अपघातात मृतांचा आकडा वाढू शकतो, मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.