मूर्ती लहान किर्ती महान, अजित डोवाल यांना का म्हटलं जातं ब्रम्हास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती केली आहे. अजित डोवाल यांच्यावर पंतप्रधान मोदी यांचा मोठा विश्वास आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या कारवाईंचे नेतृत्व केले आहे.

अजित डोवाल यांना मोदी सरकारमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनवण्यात आलंय. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांच्याकडेच ही महत्त्वाची जबाबदारी आहे. पीएम मोदींनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. पीएम मोदींचा डोवाल यांच्यावर विश्वास ठेवण्यामागची अनेक कारणे आहेत. कारण डोवाल यांनी अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आपली क्षमता दाखवली आहे. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समस्या किंवा संकटाची उद्भवतं तेव्हा पहिलं नाव अजित डोवाल यांचंच येतं.
इराकमध्ये अडकलेल्या परिचारिका परत
2014 मध्ये इराकमधील रुग्णालयात भारतीय परिचारिक अडकल्या होत्या. तेव्हा त्यांनीच त्यांची सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या गुप्त मिशनसाठी डोभाल स्वतः जून 2014 मध्ये इराकला गेले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी परिचारिकांची सुटका केली होती.
सर्जिकल स्ट्राइक
2016 मध्ये जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. त्यानंतर संपूर्ण देश संतप्त होता. सरकारवर दबाव वाढत होता. काही तरी मोठे केले पाहिजे असे सगळ्यांना वाटत होतं. दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी काय करावे असा प्रश्न पडला असताना पुन्हा अजित डोवाल यांनी सुचवलेली कारवाई करण्यात आली. सर्जिकल स्ट्राईक आणि फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये सीमेपलीकडून बालाकोट एअर स्ट्राइक देखील डोभाल यांच्या देखरेखीखाली झाले.
चीनसोबत डोकलाम वाद
डोकलाममध्ये 16 जून 2017 रोजी भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झडप झाली होती. भारतीय जवानांनी सुमारे 300 चिनी सैनिकांचं पाणीपत केलं होतं. चीन डोकलाम भागात बांधकाम करत असल्याने भारतीय जवानांनी त्यांना रोखलं होतं. त्यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण होते. त्यावेळी देखील डोकलाम वाद संपवण्यात डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
म्यानमारमध्ये लष्करी कारवाई
डोवाल यांनी लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांच्यासह म्यानमारमधील नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड अतिरेक्यांच्या विरोधात यशस्वी लष्करी कारवाईचे नेतृत्व केले होते.
कंदहार विमान अपहरण
अजित डोवाल यांनी 1999 मध्ये कंदहारमध्ये अपहरण केलेल्या विमान IC-814 मधून प्रवाशांची सुटका करण्यात तीन वाटाघाटींपैकी एक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1971 ते 1999 दरम्यान इंडियन एअरलाइन्सच्या विमानांचे किमान 15 अपहरण त्यांनी यशस्वीपणे हाणून पाडले.
ऑपरेशन ब्लू स्टार
डोवाल यांनी 1984 मध्ये खलिस्तानी बंडखोरी दडपण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’साठी गुप्तचर माहिती गोळा करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुका
डोवाल यांनी 1990 मध्ये काश्मीरमध्ये जावून सैनिकांना दहशतवादविरोधी होण्यासाठी पटवून दिले. 1996 मध्ये जम्मू आणि काश्मीर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
मिझोरम, पंजाबमध्ये बंडखोरीविरोधी कारवाया
अजित डोवाल मिझोरम आणि पंजाबमधील बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होते.
पाकिस्तानमधील गुप्तहेर एजंट
डोवाल हे पाकिस्तानमध्ये भारताचे गुप्तचर म्हणून सात वर्षे पाकिस्तानमध्ये कार्यरत होते. दहशतवादी गटांविषयी गुप्तचर माहिती त्यांनी गोळा केली होती. एक वर्ष गुप्तचर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात सहा वर्षे काम केले.
