देशातील सर्वच भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत, धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं विधान
Dharmendra Pradhan : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे शास्त्रीय भारतीय भाषांतील 55 साहित्यिक कृतींचे प्रकाशन केले. यावेळी त्यांनी देशातील सर्वच भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत असं विधान केले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे शास्त्रीय भारतीय भाषांतील 55 साहित्यिक कृतींचे प्रकाशन केले. या प्रकाशनात केंद्रीय भारतीय भाषा संस्था (CIIL) अंतर्गत कार्यरत शास्त्रीय भाषांसाठीच्या उत्कृष्टता केंद्रांनी विकसित केलेली 41 पुस्तके, तसेच केंद्रीय शास्त्रीय तमिळ संस्था (CICT) यांनी प्रकाशित केलेली 13 पुस्तके आणि तिरुक्कुरळ संकेत भाषा (Sign Language) मालिका यांचा समावेश आहे.
या संग्रहात कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया आणि तमिळ या भाषांतील महत्त्वपूर्ण शास्त्रीय व संशोधनात्मक साहित्याचा समावेश असून तिरुक्कुरळचे भारतीय संकेत भाषेतील अर्थस्पष्टीकरणही यात आहे. ही प्रकाशने शिक्षण आणि संशोधनाच्या केंद्रस्थानी भारताच्या भाषिक वारशाला स्थान देण्याच्या, सांस्कृतिक अभिमान वाढवण्याच्या आणि शास्त्रीय ज्ञानपरंपरांशी संवाद मजबूत करण्याच्या व्यापक राष्ट्रीय प्रयत्नांचा भाग आहेत.
या प्रसंगी बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सर्व भारतीय भाषांचे बळकटीकरण आणि प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक प्रयत्न केले आहेत—ज्यात अधिक भाषांचा आठव्या अनुसूचीत समावेश करणे, शास्त्रीय ग्रंथांचे भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणे आणि भारतीय भाषांमधील शिक्षणाला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे. भारतीय भाषांनी त्यांना नष्ट करण्याच्या प्रयत्नांनाही तोंड देत काळाची कसोटी पार केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. भाषा हे संवाद आणि संस्कृतीचा सेतू आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात. पंतप्रधानांच्या विचारानुसार भारतातील सर्वच भाषा या राष्ट्रीय भाषा असून भारताचा लोकशाही आत्मा जिवंत ठेवत आहेत.
भारत की भाषायी विरासत को आगे बढ़ाने और शास्त्रीय भाषाओं को सुदृढ़ करने की दिशा में आज 55 विद्वत ग्रंथों का विमोचन राष्ट्र की बौद्धिक चेतना के लिए एक महत्वपूर्ण उपलब्धि है। कन्नड़, तेलुगु, मलयालम, ओड़िया, तमिल एवं सांकेतिक भाषा में प्रस्तुत ये कृतियाँ भारत की भाषायी विरासत को… pic.twitter.com/FDLm2liOfa
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) January 6, 2026
पुढे बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, भारत हा लोकशाहीचा जनक असून प्रचंड भाषिक विविधतेचा देश आहे. देशाची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक संपदा जतन करणे आणि ती भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही समाजाची जबाबदारी आहे. भाषा या एकत्र आणणाऱ्या शक्ती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सर्व भारतीय भाषा या राष्ट्रीय भाषा असल्यावर भर दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रधान यांनी असेही नमूद केले की, तिरुक्कुरळच्या साराचा संकेत भाषेत समावेश केल्याने सर्वसमावेशक भारताच्या दृष्टीकोनाला बळ मिळते, जिथे सर्वांसाठी ज्ञानप्राप्ती सुनिश्चित केली जाते. हे प्रकाशन भारताच्या बौद्धिक साहित्याला दिलेले मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 भारतीय भाषांमधील शिक्षणाच्या दृष्टीकोनाला पुढे नेते आणि भारत एकतेत विविधतेचे जिवंत उदाहरण आहे, जिथे भाषा समाजाला जोडण्याचे माध्यम ठरते. वसाहतवादी काळातील मॅकॉले मानसिकतेच्या विरोधात, भारतीय संस्कृतीने नेहमीच भाषांकडे संवाद आणि सांस्कृतिक सलोख्याचे पूल म्हणून पाहिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या भारतीय भाषा समिती, उत्कृष्टता केंद्रे, केंद्रीय भारतीय भाषा संस्था (CIIL) आणि केंद्रीय शास्त्रीय तमिळ संस्था (CICT) यांच्या प्रयत्नांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिक्षण मंत्रालयाचे उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी; भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चामू कृष्ण शास्त्री; CIIL चे संचालक प्रा. शैलेन्द्र मोहन; CICT चे संचालक प्रा. आर. चंद्रशेखरन; सल्लागार (खर्च) श्रीमती मनमोहन कौर तसेच शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
