
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून अग्निवीर योजनेवरुन वारंवार भाजप सरकारवर निशाणा साधला जातो. त्यांच्या टीकेबाबत प्रश्न विचारल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “अग्निवीरमध्ये 100 सैनिकांपैकी 25 सैनिक कायम होतील, अशी व्यवस्था आहे. उर्वरितांना सरकार, पोलीस दल इत्यादींकडून सूट आणि इतर फायदे दिले जातील. कामावरून परतल्यावर एकही अग्निवीर निष्क्रिय बसणार नाही. त्यांच्यासाठी निमलष्करी दल आणि राज्य पोलिसांमध्ये नोकऱ्या असतील”, असं अमित शाह म्हणाले.
“या लोकांना खोटे बोलण्याचे व्यसन लागले आहे. पुन्हा पुन्हा खोटे बोलतात. मतमोजणी होईपर्यंत बोलणार आणि मग रजेवर जाणार. तिथून परत आल्यावर नवीन खोटे बोलणार. राहुल गांधी यांनी हिमाचलमधील महिलांना वचन दिले होते. त्या महिला अजूनही वाट पाहत आहे. नोकरीचे आश्वासनही दिले होते. सर्व आश्वासने व्यर्थच राहिली. इंदिराजींनी गरिबी हटवण्याचे वचन दिले होते. पण मोदीजींनी गरिबांना त्यांचा हक्क दिला”, असं अमित शाह म्हणाले.
“2014 मध्ये देशातील जनतेने नरेंद्र मोदींना ही सत्ता दिली होती. ते संविधानाच्या नावावर आरक्षणाबाबत बोलत आहेत, तर ते स्वत: हे काम करत आहेत. बंगाल आणि कर्नाटकातही त्यांनी असेच केले. मी देशातील जनतेला वचन देतो की, असे कधीही होऊ दिले जाणार नाही. देशात धर्माच्या आधारावर आरक्षणाची व्यवस्था नाही”, असं अमित शाह म्हणाले.
“आम्ही लहान असताना इंदिरा गांधींना घाबरत नव्हतो. मी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली”, असंदेखील अमित शाह म्हणाले. अमित शाह यांनी पंजाबच्या भगवंत मान सरकारवरही जोरदार हल्ला चढवला. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आल्यानंतर भ्रष्टाचार अनेक पटींनी वाढला. दिल्लीचे मुख्यमंत्री जेव्हा कुठे जातात तेव्हा ते पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसोबत जातात, अशी टीका अमित शाह यांनी केली.