मुस्लिम आरक्षणावर अमित शाह यांचं मोठं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाले?

"400 हून अधिक जागा मिळाल्यानंतर संविधान बदलले जाईल, असा आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा विचार करावा. देशातील जनतेने 2014 मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही सत्ता दिली होती. हे आरोप करणाऱ्यांना संविधान बदलण्याची प्रक्रिया काय आहे, हेच माहीत नाही", असं अमित शाह म्हणाले.

मुस्लिम आरक्षणावर अमित शाह यांचं मोठं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
| Updated on: May 28, 2024 | 11:02 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने उत्तरे दिली. विरोधकांकडून भाजपवर आरोप केला जातोय की, पुन्हा मोदी सरकार सत्तेत आलं तर संविधानात बदल केला जाईल. आरक्षणावर त्याचा परिणाम होईल. याबाबत अमित शाह यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. “400 हून अधिक जागा मिळाल्यानंतर संविधान बदलले जाईल, असा आरोप करणाऱ्यांनी स्वतःचा विचार करावा. देशातील जनतेने 2014 मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही सत्ता दिली होती. हे आरोप करणाऱ्यांना संविधान बदलण्याची प्रक्रिया काय आहे, हेच माहीत नाही”, असं अमित शाह म्हणाले.

“खरी गोष्ट ही आहे की ते संविधानाच्या नावावर आरक्षणाबाबत बोलत आहेत, तर हे लोक स्वतः हे काम करत आहेत. बंगाल आणि कर्नाटकातही त्यांनी असेच केले. जोपर्यंत देशात भाजपचा एक जरी खासदार आहे, तोपर्यंत राज्यघटना बदलू देणार नाही. आम्ही फक्त मुस्लिम आरक्षण संपवण्याबाबत बोललो आहोत, कारण देशाच्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. जे मुस्लिम मागासलेले आहेत त्यांना आरक्षण मिळत राहील”, असं अमित शाह म्हणाले.

‘पीओके हा भारताचा भाग’

“पीओके हा भारताचा भाग आहे, पीओके हा भारताच्या प्रत्येक सरकारचा मुख्य अजेंडा असावा”, असं अमित शाह म्हणाले. काश्मीरमधील परिस्थितीवर तिथले माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या दाव्यावर अमित शाह म्हणाले, “ते काहीही म्हणोत, काश्मीरमधील मतदानाची टक्केवारी हे सरकारचे धोरण तेथे यशस्वी झाल्याची साक्ष आहे. पर्यटक तिथे पोहोचत आहेत. उद्योगधंदे उभारले जात आहेत. त्यांचे वडील आणि आजोबाही सीएम होते, हे आधी का झाले नाही. ते म्हणाले की, जेव्हा-जेव्हा काश्मीरमध्ये दहशतवाद वाढला तेव्हा अब्दुल्ला कुटुंब इंग्लंडला जात असे.”

मायावतींबद्दल अमित शाह काय म्हणाले?

मायावती भाजपसाठी काम करत असल्याच्या दाव्यावर अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली. “निवडणुकांमध्ये अशा गोष्टी होत राहतात. मायावतींचा पक्ष आणि त्यांची विचारधारा भाजपशी दूरदूरपर्यंत जुळत नाही. भीतीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी लहान असतानाही राहुल गांधींच्या आजीला घाबरत नव्हतो, ते त्यांच्याविरोधातही घोषणा देत असत”, असं अमित शाह म्हणाले.

इंडिया आघाडी तत्त्वावर आधारित नसून स्वार्थावर आधारित आहे. तत्त्वावर युती झाली असती तर संपूर्ण देश सहभागी झाला असता. ही आघाडी कशी आहे हे समजत नाही. केरळमध्ये काँग्रेस-डावे आमनेसामने आहेत आणि बंगालमध्ये केजरीवाल आणि काँग्रेस दिल्लीत एकत्र आहेत, पण पंजाबमध्ये विरोधात आहेत, असं अमित शाह म्हणाले. “केजरीवाल यांच्यापासून आम्हाला कोणताही धोका नाही, ते तुरुंगात जाणार की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने ठरवायचे आहे. दोन्ही पक्ष एकत्र असूनही दिल्लीतील सातही जागा भाजप जिंकत आहे”, असा दावा अमित शहा यांनी केला.