
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण अंजली दमानिया यांनी लावून धरलं आहे. यासाठी त्या आज दिल्लीत गेल्या आहेत. अंजली दमानिया यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. आपल्या तीन मागण्यांसाठी त्या अमित शाह यांना भेटणार आहेत. पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील महार वतनाची 1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप झाला. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या आरोपांची गंभीर दखल घेत या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले.
आपल्या तीन मागण्यासाठी अंजली दमानिया यांना अमित शाह यांना भेटायचं आहे. यात एक अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. दुसरी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि तिसरी खारगे समिती बर्खास्त करण्याची मागणी आहे. “अजित पवार यांच्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा नकोय. पण त्यांच्याकडून पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा. खारगे समिती पुर्नगठीत करुन निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. त्यात एका आयपीएस आणि सध्याचे खारगे असले तरी चालतील. 30 दिवसांच्या आत या कमिटीने आपला रिपोर्ट दिला पाहिजे. एकही दिवस त्यांना वाढवून देऊ नये” या मागण्यांसाठी अंजली दमानिया दिल्लीत दाखल झाल्या आहेत.
हा व्यवहार पवारांना रद्द करता येणार नाही का?
अंजली दमानिया यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतलेली. त्यात त्यांनी स्पष्ट केलेलं की, जर २४ तासांत अजित पवारांचा राजीनामा घेतला नाही, तर मी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेईन. गृहमंत्री म्हणून त्यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा असं आश्वासन भारताच्या जनतेला दिलं होतं, त्याची आठवण अंजली दमानिया यांनी करुन दिली. पार्थ पवार यांचा जमीन व्यवहार आता रद्द झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण हा व्यवहार पवारांना रद्द करता येणार नाही असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे.