CJP चा आणखी एक मोठा विजय, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. सीजेपीचे नेता आणि राष्ट्रीय प्रवक्ता सौरव दास यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हिंदुत्व समर्थक आणि इन्फ्लुएंसर स्वतंत्र भारद्वाजला दिल्लीमधील एका न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने स्वतंत्र भारद्वाजला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे दिल्ली हाय कोर्टाने देखील त्याला मोठा झटका दिला आहे, दिल्ली हाय कोर्टाकडून त्याची अटकेपासून संरक्षणाची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. एससी- एसटी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत भारद्वाजला अटक करण्यात आलं आहे. दरम्यान एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या कोर्टाने स्वतंत्र भारद्वाजला मोठा झटका दिला आहे.
त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. सीजेपीचे नेता आणि राष्ट्रीय प्रवक्ता सौरव दास यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटवर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. दिल्ली हाय कोर्टाने एका गुंडाची याचिका फेटाळून लावली आहे, तसेच ट्रायल कोर्टाने देखील त्याची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली आहे. हा शांतता आणि न्याय प्रिय असलेल्या सीजेपीचा मोठा विजय आहे, असं सौरव दास यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सौरव दास यांनी आपली पोस्ट निशू आजाद यांना देखील टॅग केली आहे. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. आमचं पुढे देखील या प्रकरणावर लक्ष असेल, जोपर्यंत तुम्हाला पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सौरव दास यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणातील वकिलांचे देखील सौरव दास यांनी आभार मानले आहेत.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. तब्बल 35 दिवस दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सीजेपीचं आंदोलन सुरू होतं. संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता, त्यानंतर अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कॉकरोच जनता पार्टीचा हा मोठा विजय होता. त्यानतंर देखील आता कॉकरोच जनता पार्टीकडून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभा घेतला जात असल्याचं पहायला मिळत आहे.
