ज्याला भाऊ मानलं त्यानेच केला पाकिस्तानचा मोठा गेम, नव्या संकटानं शहबाज शरीफ, मुनीर यांची उडाली झोप
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान चारही बाजुनं संकटात सापडला आहे, भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, आता आणखी एका नव्या संकटाला पाकला तोंड द्यावं लागणार आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, यामध्ये शंभर पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला, या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं पाकिस्तानचा हल्ला परतून लावला, त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे, पाकिस्तानचे अनेक एअर बेस उद्ध्वस्त झाले आहेत. भातानं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. त्यानंतर पाकिस्तानला धक्क्यावर धक्के बसत आहेत.
आता आणखी एक मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेना प्रमुख असीम मुनीर यांच्यासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. ज्याच्याकडून मित्रत्वाची अपेक्षा ठेवली होती, त्याच्याकडूनच पाकिस्तानला मोठा धोका मिळाला आहे. एका रिपोर्टनुसार बांगलादेशमधील नागरिक मोठ्या संख्येनं पाकिस्तानमधील सर्वात मोठी दहशतवादी संघटना असलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) मध्ये सहभागी होत आहेत. काही दिवसांपूर्वीच तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानी सैन्यानं हल्ला केला होता. या हल्ल्यात 54 दहशतवादी मारले गेले, त्यामध्ये एका बांगलादेशी नागरिकाचा देखील समावेश होता.अहमद जोबेर असं या व्यक्तीचं नाव आहे, तो आधी बांगलादेशातून सऊदी अरेबियामध्ये गेला आणि तिथून या दहशतवादी संघटनेत भरती झाला.
बांगलादेशच्या एका स्थानिक पोर्टलने केलेल्या दाव्यानुसार सध्या आठ बांगालादेशी नागरिक तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानमध्ये सक्रीय आहेत. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यातच आता बांगलादेशी नागरिक देखील या संघटनेत सहभागी होत आहेत, त्यामुळे पाकिस्तान समोर दुहेरी संकट निर्माण झालं आहे, काही बांगलादेशी नागरिक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून टीटीपीसाठी काम करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
एकीकडे पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, भारतानं पाकिस्तानची कोंडी केली आहे. तर दुसरीकडे आता आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे, बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येनं तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानमध्ये सहभागी होत आहेत, या रिपोर्टमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे.
