शिवराज सिंह चौहान भाजप अध्यक्षपदाच्या रेसमध्ये ? मोहन भागवतांशी भेटीने चर्चांना उधाण
भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी वेगाने सुरू आहे, 28 सप्टेंबरपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी यासाठ कसून तयारी सुरू आहे. याच दरम्यान अध्यक्षपदाच्या रेसमध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांचं नाव चर्चेत आलं आहे. तब्बल 2 वर्षानंतर त्यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली. 45 मिनिट झालेल्या या भेटीचा आता निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे

केंद्रीय कृषी मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची नुकतीच भेट झाली. मात्र या भेटीनंतरच आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. कारण या दोघांच्या झालेल्या याभेटीचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीशी संबंध जोडला जात आहे. या भेटीमुळे आका भाजप अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या शर्यतीत शिवराज सिंह चौहान यांचे नाव वेगाने चर्चेत आले आहे.
तब्बल 2 वर्षानंतर शिवराज सिंह चौहान यांची मोहन भागवत यांच्याशी भेट झाली. खरंतर, सप्टेंबरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक घेण्याच्या प्रयत्नात भाजप आणि आरएसएस दोघेही आहेत. मात्र याचदरम्यान, चौहान आणि भागवत यांच्या 2 वर्षांनंतर झालेल्या भेटीचा या निवडणुकीशी संबंधही जोडला जात आहे. 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यावर लागलीच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाऊ शकते. 28 सप्टेंबरपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
45 मिनिटांची बैठक
केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक दिल्लीतील झंडेवालन येथ असलेल्या केशव कुंज, या संघ कार्यालयात झाली. शिवराज सिंह चौहान यांनी संघ प्रमुखांशी सुमारे 45 मिनिटे चर्चा केली. या बैठकीनंतर शिवराज सिंह चौहान थेट दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला येण्यापूर्वी शिवराज सिंह चौहान हे प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे गायत्री परिवाराच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी चौहान यांच्यासोबत गायत्री परिवाराचे डॉ. चिन्मय पंड्या आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हेही उपस्थित होते. भारत मंडपमहून चौहान हे थेट संघ कार्यालयात गेले जिथे त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली.त्यानंतर ते पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी भोपाळला रवाना झाले. सोमवारी भोपाळ येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) च्या दीक्षांत समारंभासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहणार आहेत.
बैठकीनंतर निवडणुकीबद्दलच्या अटकळींना वेग
भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदलाची लाट दिसत आहे, अशा परिस्थितीत शिवराज सिंह चौहान यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर अनेक अटकळींना वेग आला आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपला आपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडता आलेला नाही. भाजपचे नेतृत्व आणि संघ यांच्यातील समन्वयाचा अभाव हे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीला विलंब होण्याचे एक मुख्य कारण मानले जात आहे. अशा परिस्थितीत शिवराज सिंह चौहान यांचा संघप्रमुखांसोबत झालेल्या भेटीचा संबंध भाजप संघटनेतील बदलांशी जोडला आहे.
