
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून भारत आणि अमेरिकेतील तणाव वाढताना दिसत आहे. अशातच आता भारताने अमेरिकेला मोठा दणका दिला आहे. टपाल विभागाने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन सरकारच्या अलिकडेच जारी केलेल्या कार्यकारी आदेश क्रमांक 14324 मुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकन सरकाने 30 जुलै रोजी एक आदेश जारी करत $800 पर्यंतच्या वस्तूंवर करातून देण्यात आलेली सूट मागे घेतली होती. त्यानंतर आता भारतानेही अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने अमेरिकेच्या कराला दिलेले हे उत्तर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के कर लादला आहे. त्यानंत रशियन तेल खरेदी केल्याची शिक्षा म्हणून अतिरिक्त 25% कर लादला आहे. त्यामुळे आता भारताने हा निर्णय घेतला आहे.
भारतीय टपाल विभागाने एक निवेदन जारी केले आहे. यात टपाल विभागाने म्हटले की, ’29 ऑगस्टपासून, अमेरिकेला जाणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टपाल वस्तूंवर कस्टम ड्युटी लावली जाणार आहे. मात्र 100 डॉलर्सपर्यंतच्या भेटवस्तूंना यातून सूट दिली आहे. कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शनने 15 ऑगस्ट रोजी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र याबाबत अद्याप स्पष्टता नाही, त्यामुळे अमेरिकेत जाणाऱ्या विमान कंपन्यांनी 25 ऑगस्टनंतर ऑपरेशनल तयारी अभावी वस्तूंची वाहतूक करु शकणार नाही अशी माहिती दिली आहे.
आपल्या निवेदनात पुढे टपाल विभागाने म्हटले आहे की, ‘वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन, टपाल विभागाने 25 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेला पाठवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंचे बुकिंग तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 100 अमेरिकन डॉलर्स पर्यंत किमतीची पत्रे / कागदपत्रे आणि भेटवस्तू पाठवता येतील. ज्या ग्राहकांनी आधीच अशा वस्तू बुक केल्या आहेत, त्यांना टपाल खर्च परत केला जाणार आहे. दरम्यान, भारत उचलत असलेल्या या पावलांमुळे अमेरिकेची चिंता वाढताना दिसत आहे.