
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. 22 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. याप्रकरणात काश्मीरमधील दोघांनी त्यांना आश्रय दिल्याचे समोर आले होते. हल्ला करणारे तिघेही पाकिस्तानी होते हे समोर आले आहे. पण या हल्ल्यानंतर तीन दहशतवाद्यांचे जे रेखाचित्र समोर आले होते. त्याविषयी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठा खुलासा केला आहे. एनआयने केलेल्या या खुलाशामुळे हल्ल्याच्या तपासाची दिशा बदलली आहे. काय आहे तो दावा?
Lashkar-A-Taiba चे दहशतवादी
एनआयएने केलेल्या तपासात पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हे लष्कर ए तैयब्बा या संघटनेशी संबंधित होते. पहलगाम जवळील बटकोटे येथील परवेझ अहमद जोथार आणि हिलपार्क येथील बशीर अहमद जोथार यांच्या घरी त्यांनी जेवण केले होते. या दोघांनी या सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली. त्यानंतर या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. एनआयएने याविषयीचा एक मोठा खुलासा केला आहे.
रेखाचित्रातील दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही
22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला. त्यात धर्म विचारून पर्यटकांमधील पुरुषांची हत्या करण्यात आली. त्यात एक स्थानिक काश्मिरी आणि एक नेपाळी नागरिक सुद्धा मारल्या गेला. या हल्ल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली. हल्ल्याच्या दोन दिवसानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचे तीन रेखाचित्र (Sketch) जारी केले. यामध्ये पाकिस्तानी नागरिक हाशिम मुसा, अली भाई उर्फ तल्हा आणि काश्मिरी नागरिक हुसेन ठोकर यांचा समावेश होता. पण आता एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखाचित्रातील तिघांचाही पहलगाम हल्ल्याशी संबंध नव्हता. हल्ला करणारे पाकिस्तानी दहशतवादी दुसरेच आहेत.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कोण?
सूत्रांच्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यात सुलेमान शाह हा एक दहशतवादी आहे. तो गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी 7 बांधकाम कर्मचार्यांच्या हत्येत सहभागी होता. श्रीनगर-सोनमर्ग महामार्गावरील बोगद्याचे बांधकाम करणारे हे कर्मचारी होते. याच हत्याकांडातील शाह याचा साथीदार जुनैद रमजान भट हा होता. तो 4 डिसेंबर रोजी चकमकीत मारल्या गेला होता. त्याच्या फोनमधूनच पोलिसांना जुनैद आणि तीन दहशतवाद्यांचा फोटो जप्त केला होता. हाच फोटो 22 एप्रिलच्या हल्ल्यानंतर व्हायरल झाला होता.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यासाठी एनआयने व्यापक तपास मोहिम हाती घेतली आहे. स्थानिकांची त्यासाठी मदत घेण्यात आली. त्यात त्यांना यश आले. जोथार यांच्या घरी जेवलेल्या दहशतवाद्यांची माहिती एनआयएच्या हाती आली. पहलगाम हल्ल्यावेळी स्थानिकांना त्यांची छायाचित्र दाखवण्यात आली. हे तेच दहशतवादी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तपासाची दिशा बदलली आहे. एनआयए आणि स्थानिक तपास यंत्रणा त्यांच्याविरोधात भक्कम पुरावा गोळा करत आहेत.