मोठी बातमी! बिहार विधान परिषद निवडणूक निकालात मोठा उलटफेर, भाजपला आणखी एक मोठा धक्का
राज्यात पाच जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक झाली, यामध्ये महायुतीला पराभवाचा धक्का बसला. महाविकास आघाडीला पाच पैकी तीन जागा मिळाल्या, दरम्यान त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

राज्यात पाच विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये महायुतीला पराभवाचा मोठा धक्का बसला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचं पहायला मिळालं. पाचपैकी अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि पुणे शिक्षक मतदारसंघ अशा दोन जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे तीन जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. ज्यामध्ये पुणे, मराठवाडा आणि नागपूर अशा तीनही पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान या तीन जागा गमावल्यानंतर आता महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. भाजपकडून शिवसेना शिंदे गटावर आरोप करण्यात येत आहेत. पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात उघड उघड भूमिका घेतली होती. त्यानंतर मराठवाडा पदवीवर मतदारसंघात देखील असंच चित्र पहायला मिळालं. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उघड उघड महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता भाजपकडून महायुतीच्या पराभवाचं खापर शिवसेना शिंदे गटावर फोडण्यात येत आहे. यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान एकीकडे महाराष्ट्रात तर भाजपला मोठा धक्का बसलाच आहे, मात्र दुसरीकडे बिहार विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. बिहारमधील दरभंगा पदवीधर मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. या मतदारसंघामधून भाजपने विद्यमान आमदार सर्वेश कुमार यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र या पदवीधर मतदारसंघामध्ये मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय जनता दल आरजेडीचे उमेदवार अनिल झा यांनी भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार असलेल्या सर्वेश कुमार यांचा पराभव केला आहे. अनिल झा या मतदारसंघातून 450 मतांनी विजयी झाले आहेत.
बिहारमधील आठ विधान परिषद जांगाचा निकाल लागला आहे, ज्यामध्ये एक पदवीधर आणि एक शिक्षक मतदारसंघ अशा दोन जागा भाजपला मिळाल्या आहेत. तर दोन जागा या आरजेडीला मिळाल्या असून, दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. आणि प्रत्येकी एक -एक जागा जदयू आणि जन सुराज पार्टी यांना मिळाल्या आहेत.
