
Bihar Assembly Election Voting : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीचा महासंग्राम आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांमधील एकूण १२१ मतदारसंघांमध्ये मतदानाचा हक्क बजावला जात आहे. या टप्प्यात अनेक राजकीय दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. बिहारमध्ये एनडीए (NDA) विरुद्ध महागठबंधन अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. या दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील अनेक मोठे आणि महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या टप्प्यातील मतदानातून बिहारच्या पुढील राजकारणाची दिशा आणि सत्ता कुणाच्या हाती जाणार याचे संकेत मिळणार आहेत.
बिहारमधील पहिल्या टप्प्यात मतदानात अनेक स्टार उमेदवारांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या जागांवर जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. युवा नेते आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. वैशाली जिल्ह्यातील ही जागा लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाचा पारंपरिक गड आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांना कडवे आव्हान मिळत आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महत्त्वाचे नेते सम्राट चौधरी हे तारापूर मतदारसंघातून लढत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा राजकीय इतिहास असलेल्या या जागेवर त्यांना आरजेडीचे आव्हान आहे.
उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांची लखीसराय जागा आणि तेजस्वी यांचे बंधू तेज प्रताप यादव यांची महुआ जागाही चर्चेत आहे. त्यासोबतच प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांनी भाजपच्या तिकिटावर अलीनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्यासाठीही आज मतदान होत आहे. तर अटकेत असलेले जेडीयूचे उमेदवार अनंत सिंह यांची वादग्रस्त मोकामा जागा आणि दिवंगत नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचे पुत्र ओसामा शहाब यांची रघुनाथपूर जागेसाठीही मतदान पार पडत आहे.
या टप्प्यात तीन कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात १.९८ कोटी पुरुष आणि १.७६ कोटी महिलांचा समावेश आहे. मतदान सुरु असताना कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगाने लाईव्ह वेबकास्टिंग प्रणालीचा वापर करत आहे. सर्व मतदान केंद्रांवर कॅमेऱ्यांच्या मदतीने थेट नियंत्रण कक्षातून बारकाईने नजर ठेवली जात आहे. गैरप्रकारांना वाव मिळू नये, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. यानंतर उर्वरित १२२ जागांवर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. या संपूर्ण निवडणुकांचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.