
सर्वांचं लक्ष लागलेल्या बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर आज मतमोजणी होऊन निकाल समोर येऊ लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आत्तापर्यंत 121 जागांचे ट्रेंड दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, एनडीएमधून जेडीयू 71 जागांवर तर भाजप 69 जागांवर आघाडीवर आहे. तसेच एलजेपी (आर) 17 जागांवर आणि एचएएम 4 जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीत, आरजेडी 43 जागांवर, काँग्रेस 9 जागांवर, सीपीआय (एमएल) 5 जागांवर आणि व्हीआयपी 1जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रात शिंदे -फडणवीस यांच्या महायुतीने जे करून दाखवल, त्याच दिशेने नीतिशुकमार-मोदींच्या एनडीएची वाटचाल सुरू आहे.
बिहार निवडणुकीतील आतापर्यंतच्या कलांकडे पाहता एनडीएचंच पुन्हा सरकार सत्तेत येणार असून, हा विजय नेमका कसा झाला ते 5 मुद्यांमध्ये समजून घेऊया.
1. नीतीश-मोदी यांच्या जोडीवर विश्वास कायम
बिहार निवडणुकीतील निकालाच्या आतापर्यंतच्या ट्रेंडवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे बिहारमधील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर विश्वास कायम आहे. 20 वर्षे सत्तेत राहिल्यानंतरही बिहारमधील जनता नितीशकुमारांवर नाराज नाही हे या ट्रेंडवरून स्पष्ट होते. त्याचाच परिणाम असा की, बिहारमध्ये केवळ नितीशकुमार यांचा जेडीयू हाच पक्ष नव्हे तर एनडीएतील सर्व घटक पक्षांचे उमेदवारही ट्रेंडमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
2. बिहारच्या जनतेने तेजस्वी यादवना मुख्यमंत्री म्हणून नाकारलं
बिहार विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतच्या ट्रेंडवरून हेही स्पष्टं होतंय की, बिहारच्या बहुतांश जनतेने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे. महाआघाडीने सुरुवातीला तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले आणि यासाठी एक औपचारिक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. कित्येक बॅनर्सवर आणि पोस्टर्सवर फक्त तेजस्वी यादव यांचा फोटो झळकत होता, त्यात महाआघाडीच्या इतर नेत्यांचे फोटो वगळण्यात आले होते. महाआघाडीच्या संपूर्ण निवडणूक प्रचारावर नजर टाकली तर तेजस्वी यादव हेच जळी स्थळ काष्ठी पाषाणी दिसत होते. मात्र एवढ्या जास्त प्रोजेक्शननंतरही महाआघाडीची झालेली पिछेहाट पाहून हेच दिसून येतं की बिहारच्या लोकांना मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादवयांचा चेहरा योग्य वाटत नाही.
3. राहुल गांधींचा व्होट चोरीचा मुद्दाही नाही चालला
या निवडणुकीच्या निकालाच्या ट्रेंडवरून हेही स्पष्टपणे दिसून आलं की राहुल गांधी यांचा मतचोरीचा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. मतचोरीचा मुद्दा ठसवण्यासाठी राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार हक्क यात्रा काढली होती.
या दौऱ्यादरम्यान, तेजस्वी यादव, दीपांकर भट्टाचार्य आणि मुकेश साहनी यांच्यासह महाआघाडीच्या नेत्यांनी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोल ठरल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, सध्याच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस फक्त 11 जागांवर आघाडीवर आहे.
4. जनसुराजलाही बिहार वासीयांनी नाकारलं
बिहार निवडणुकीतील मतमोजणीच्या आतापर्यंतच्या ट्रेंडमधून असंही दिसून आलं की प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षालााही लोकांनी थेट नाकारलं आहे. प्रशांत किशोर हे प्रचंड विजयाचा दावा करत होते, मात्र ट्रेंड्सवरून असं दिसतंय की ते त्यांचे खातंही उघडू शकणार नाहीत. सोशल मीडियावरील “जनसुराज” चे भव्य दावे पूर्णपणे फोल ठरताना दिसत आहेत
5. महिला आणि EBCचा एनडीएवर विश्वास कायम
बिहार निवडणुकीत झालेल्या मोठ्या मतदानानंतर, आपल्या बाजूने मतदान होईल असा दावा महाआघाडी करत होती. विशेषतः, मतदान केंद्रांवर महिलांच्या मोठ्या संख्येने मतदानाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. पण आज मतमोजणी होत असताना आतापर्यंत आलेल्या ट्रेंडवरून हेच स्पष्ट होतंय की महिलांचा एनडीएवर विश्वास कायम आहे. त्याच वेळी, उपमुख्यमंत्रीपदासाठी मुकेश साहनी यांचे नामांकन महाआघाडीसाठी फारसे फायदेशीर ठरल्याचे दिसत नाही.आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवल्याने महाआघाडीला ईबीसी मतांचा मोठा टक्का मिळेल असा दावा मुकेश साहनी करत होते, परंतु ट्रेंडमध्ये काही वेगळंच चित्र दिसत आहे.