काँग्रेस खासदाराच्या पत्नीवर ISI एजंट असल्याचा आरोप, कोण आहे एलिजाबेथ कोलबर्न?

Political Controversy: एलिझाबेथ कोलबर्न यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 2013 मध्ये गौरव गोगोई यांच्याशी लग्न केले होते.

काँग्रेस खासदाराच्या पत्नीवर ISI एजंट असल्याचा आरोप, कोण आहे एलिजाबेथ कोलबर्न?
गौरव गोगोई आणि एलिझाबेथ कोलबर्न
| Updated on: Feb 15, 2025 | 5:08 PM

Who is Elizabeth Gogoi: काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची ब्रिटीश वंशीय पत्नी एलिझाबेथ कोलबर्न चर्चेत आल्या आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी गोगोई आणि एलिझाबेथ कोलबर्न यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी नवी दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्त अब्दुल बासित यांची गौरव गोगोई यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर लोकसभेत विचारलेला प्रश्न? यावर शंका उपस्थित केली आहे. त्यानंतर काँग्रेसचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय सोबत आहे आणि चीनसोबत त्यांचे संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, भाजपकडून होत असलेल्या या आरोपांवर गौरव गोगोई यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर मोठा आरोप केला होता. गौरव गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ यांचे संबंध पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयसोबत असल्याचा आरोप केला होता. तसेच भाजप प्रवक्ते अजय अलोक यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडला.

भाजपचा आरोप काय?

अजय आलोक यांनी सांगितले की, गौरव गोगोई यांनी 2013 मध्ये एलिजाबेथ कोलबर्नसोबत लग्न केले. त्यानंतर काँग्रेसने त्यांना 2014 मध्ये निवडणुकीचे तिकीट दिले. त्यानंतर पुढील वर्षी गोगोई यांनी पाकिस्तान दुतावासातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते संसदेच्या परराष्ट्र प्रकरणाशी संबंधित समितीचे सदस्यसुद्धा नव्हते. तसेच त्या भेटीची माहिती त्यांनी शासनाला कळवली नव्हती. या भेटीनंतर गोगोई यांनी लोकसभेत जे प्रश्न विचारले ते भारताच्या सुरक्षेशी संबंधित होते. त्यात भारताच्या किनारपट्टीच्या सागरी सुरक्षेची स्थिती काय आहे, भारताच्या किनारपट्टीवर किती रडार बसवले आहेत आणि किती बसवायचे आहेत. याशिवाय राष्ट्रीय सागरी प्राधिकरण सर्व संबंधितांशी समन्वय वाढवेल असे प्रश्न विचारले.

काय आहे एलिझाबेथ यांच्यावर आरोप

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांनी एलिझाबेथवर टीका करणे सुरूच ठेवले. ते म्हणाले, एलिझाबेथ यांनी काही काळ पाकिस्तानमध्ये घालवला आहे. जिथे आयएसआयची आघाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेमध्ये काम केले होते. एलिझाबेथ यांनी क्लायमेट अँड डेव्हलपमेंट नॉलेज नेटवर्कसाठी काम केले होते.

कोण आहे एलिझाबेथ

एलिझाबेथ कोलबर्न यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 2013 मध्ये गौरव गोगोई यांच्याशी लग्न केले होते. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा गौरव गोगोई मुलगा आहे. ते 2024 पासून लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेतेपद सांभाळत आहेत. ते सध्या आसामच्या जोरहाट लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.