भाजपकडून चारही राज्यात विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच पुन्हा संधी! कोणत्या राज्यात मुख्यमंत्रीपदी कोण?

| Updated on: Mar 21, 2022 | 8:05 PM

उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चारही राज्यात भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान मुख्यमंत्र्यांवरच विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. त्यातील मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर उर्वरित तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधि सोहळा लवकर पार पडणार आहे.

भाजपकडून चारही राज्यात विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच पुन्हा संधी! कोणत्या राज्यात मुख्यमंत्रीपदी कोण?
चारही राज्यात भाजपकडून विद्यमान मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा संधी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं दमदार प्रदर्शन केलं. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा सत्ता मिळवली. या चारही राज्यात काँग्रेसचा (Congress) मानहाणीकारक पराभव झाला. पंजाबमध्ये तर आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) काँग्रेसचा सुपडा साफ करत सत्तेतून बाजूला केलं. त्यानंतर आता भाजपकडून चारही राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा करण्यात आलीय. महत्वाची बाब म्हणजे उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चारही राज्यात भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान मुख्यमंत्र्यांवरच विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. त्यातील मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर उर्वरित तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधि सोहळा लवकर पार पडणार आहे.

उत्तर प्रदेश – योगी आदित्यनाथ

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपनं पुन्हा एकदा यश मिळवलं. समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी योगींना जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या ‘बुलडोझर’पुढे समाजवादी पक्षाची ‘सायकल’ फिकी पडली. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यास योगी आदित्यनाथ हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित होतं. किंबहुना भाजपकडून त्याबाबत घोषणाही करण्यात आली होती. निवडणूक निकालानंतर दिल्लीतील भाजप मुख्यालयात बोलताना नरेंद्र मोदी यांनी योगींच्या नावाची घोषणाही केली होती. दरम्यान, योगींचा शपथविधी 25 मार्चला होणार आहे. योगींच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अनेक केंद्रीय कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणार आहेत.

25 मार्चला योगींचा शपथविधी होण्याची शक्यता

गोवा – प्रमोद सावंत

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपनं पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवलं. तसंच अपक्ष मिळून भाजपकडे सध्या 25 आमदारांचं संख्याबळ आहे. अशावेळी भाजप सत्तास्थापन करणार हे स्पष्ट होतं. मात्र, विश्वजीत राणे यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा समोर आल्यानं गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न विचारला जात होता. याबाबत राजधानी दिल्लीत बैठकांचं सत्रही पार पडलं. त्यानंतर आज अखेर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विश्वजीत राणे यांनीच प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती पर्यवेक्षक नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आल्यानंतर प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

प्रमोद सावंतांकडून भाजप नेत्यांचे आभार व्यक्त

उत्तराखंड – पुष्कर सिंह धामी

उत्तराखंडमध्ये भाजपनं पाच वर्षात चार मुख्यमंत्री बदलले होते. त्यामुळे यावेळी उत्तराखंडमध्ये भाजप कुणाच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदीचा जबाबदारी देणार याकडे राज्यकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याच गळ्यात भाजपनं पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. देहरादून इथं विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर पर्यवेक्षक केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उपपर्यवेक्षक मीनाक्षी लेखी यांनी पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा केलीय. दरम्यान, उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुष्कर सिंह धामी, सतपाल महाराज, माजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक, खासदार अनिल बलूनी यांची नाव चर्चेत होती. मात्र, पुष्कर सिंह धामी या शर्यतीत अग्रभागी राहिले आणि राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाची माळ धामी यांच्या गळ्यात घातली.

उत्तराखंडमध्ये पुन्हा पुष्कर सिंह धामी

मणिपूर – एन बीरेन सिंह

एन बिरेन सिंह यांनी सोमवारी दुसऱ्यांदा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मणिपूर भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एन बिरेन सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. महत्वाची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही धामी यांच्यावर भाजपनं विश्वास ठेवलाय. एन बिरेन सिंह यांच्या निवडीनंतर पर्यवेक्षक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी समाधान व्यक्त केलं. सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘मला विश्वास आहे की सिंह यांची टीम आणि ते मणिपूरच्या विकास एका नव्या उंचीवर नेतील. तसंच मागील पाच वर्षात केलेली कामं ते चालू ठेवतील, अशा शब्दात मोदी यांनी एन बिरेन सिंह यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एन बिरेन सिंह यांचा शपथविधी

इतर बातम्या :

Goa CM Pramod Sawant : गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा प्रमोद सावंत, विश्वजीत राणेंनीच मांडला प्रस्ताव!

Uttarakhand CM : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा पुष्कर सिंह धामी, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब