हातपाय डमगमतात तरीही 16-18 वर्षाच्या सुंदर मुली हव्यात… भाजपचा आमदार हे काय बोलून गेला…
मध्यप्रदेशातील भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांचे 'चांगली गाय, कसदार जमीन आणि 16-18 वर्षांच्या सुंदर मुली' यावरील विधान चर्चेत आहे. मध्यप्रदेश स्थापना दिनी त्यांनी वय होऊनही सत्तेची लालसा न संपणाऱ्यांवर टोलेबाजी केली. शाक्य यांचे हे विधान राजकीय वर्तुळात वादग्रस्त ठरले असून, राज्यभर त्याची चर्चा होत आहे. यामुळे भाजपला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

मध्यप्रदेशातील भाजपचे आमदार पन्नालाल शाक्य यांचं एक विधान प्रचंड चर्चेत आहे. चांगली दूध देणारी गाय, कसदार जमीन आणि 16-18 वर्षाच्या सुंदर मुलींचं एक वेगळं महत्त्व असायचं, असं सांगतानाच आता एखाद्याचे हातपाय डगमगत असतील, पण त्यांच्या इच्छा संपत नाहीत. ज्यांचं वय भजन करायचं आहे, त्यांना सिंहासनावर बसायचं आहे, असा टोला आमदार पन्नालाल शाक्य यांनी लगावला आहे. शाक्य यांच्या या विधानाची राजकीय चर्चा रंगली आहे. तसेच शाक्य यांचं हे विधान चांगलंच व्हायरल झालं आहे.
मध्य प्रदेश स्थापना दिनाच्या निमित्ताने जिल्हा स्तरीय समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गुनाचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी केलेली टोलेबाजी चर्चेचा विषय बनली आहे. शुभ विदाई गार्डनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी जुन्या म्हणीचा आधार घेत वय, महत्त्वकांक्षा आणि सत्तेची लालसा यावर भाष्य केलं. मात्र, त्यांनी या भाषणात 16 ते 18 वर्षाच्या तरुणींवर भाष्य केल्याने त्यांच्या विधानाची अधिक चर्चा होत आहे.
अन् सिंहासनावर बसायचंय
शाक्य यांनी जुन्या म्हणीचा संदर्भ देत तीन गोष्टींचं महत्त्व पटवून दिलं. जुन्या काळात या तीन गोष्टींमध्ये चांगलं दूध देणारी गाय, पिकाऊ जमीन आणि 16 वा 18 वर्षाच्या सुंदर तरुणींचा समावेश असायचा, असं सांगतानाच एखाद्या व्यक्तीचे हातपाय हालत आहेत. पण त्याची इच्छा काही मरत नाही. राज्यात सध्या असंच काही सुरू आहे. ज्यांचं वय भजन कीर्तन करण्याचं आहे. त्यांना सिंहासनावर बसायचं आहे, असं ते म्हणाले.
अधिकाऱ्यांनाही हसू अनावर
त्यांनी आपल्या भाषणात कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, जिथे तीर मारायचा तिथे मारला. त्यांनी वय आणि सत्तेची लालसा या दोन गोष्टींवर भर दिल्याने त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. सरकारी मंचावरूनच त्यांनी हे विधान केल्याने ते अधिक चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे शाक्य यांनी हा टोला मारताच अधिकाऱ्यांमध्ये एकच खसखस पिकली. त्यांना हसू अनावर झाले.
मध्यप्रदेश स्थापना दिनाचं औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला आमदार पन्नालाल शाक्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र सिंह सिकरवार, कलेक्टर किशोर कुमार कन्याल, पोलीस महासंचालक हितिका वसल यांच्यासहीत अनेक लोकप्रतिधीनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
