सीजेपी फिनिश ! कॉकरोच जनता पार्टीचे नेते अनेक महिन्यांसाठी तुरुंगात जाणार; सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशाचा दावा
मार्कंडेय काटजूंच्या मते, पीस बॉन्डवर स्वाक्षरी केल्यामुळे 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) चे नेते दीर्घकाळासाठी तुरुंगात जातील. यामुळे त्यांचे राजकीय करिअर संपले असून पक्ष 'फिनिश' झाला आहे. काटजू यांनी या घटनेची तुलना इंग्रज राजवटीतील क्रांतिकारकांच्या माफीनाम्याशी केली, ज्यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली आणि जनतेचा विश्वास गमावला. पीस बॉन्डचे उल्लंघन केल्यास दीर्घकाळ कारावास निश्चित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांनी पीस बॉन्ड सही करून स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्केंडेय काटजू यांनीही तसं थेटपणे सांगितलं आहे. अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचं करिअर संपलं आहे. सीजेपी फिनिश झाली आहे, असं मार्केंडेय काटजू यांनी म्हटलं आहे. सीजेपी नेत्यांनी पीस बॉन्ड सही करून आपलं करिअर उद्ध्वस्त करून घेतलं आहे. आता या पीस बॉन्डचं उल्लंघन केलं आणि आंदोलन केलं तर त्यांना तुरुंगात पाठवलं जाणार आहे. सौरभ दास आणि आशुतोष रांका केवळ आठवडाभरासाठी तुरुंगात गेले. पण आता त्यांनी आंदोलन केलं तर त्यांना दीर्घकाळासाठी पोलीस तुरुंगात पाठवतील. त्यामुळे सीजेपीचे नेते घाबरत आहेत, असं मार्केंडेय काटजू यांनी म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्केंडेय काटजू निवृत्तीनंतर कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. त्यांनी सीजेपी नेत्यांच्या पीस बॉन्ड सही करण्याची तुलना माफीनाम्याशी केली आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. सीजेपी नेत्यांची प्रतिमा पळपुटे अशी झाली आहे. पीस बॉन्डवर त्यांनी सही केल्याने जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असं मार्केंडेय काटजू यांनी म्हटलं आहे.
करिअरच संपलं…
ज्या लोकांनी पीस बॉन्ड सही केला आहे, त्यांचं करिअर संपलं आहे. जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. पळपुटे अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. जेव्हा इंग्रजांचं सरकार होतं, तेव्हा क्रांतिकारकांना अटक केली जायची. त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेऊन त्यांना सोडून दिलं जायचं. नाही तर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जायची. जे लोक माफीनामा लिहून देत होते, त्यांचं करिअर संपायचं. जनता अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवत नाही, असं काटजू म्हणाले.
सीजेपी संपली, फिनिश
पीस बॉन्डचा अर्थ असा होतो की आम्ही परत कधीच आंदोलन करणार नाही, असं तुम्ही लिहून दिलंय. कारण तुम्ही आंदोलन केलं तर पोलीस म्हणतील तुम्ही शांती भंग करत आहात. तुम्ही पीस बॉन्डचं उल्लंघन केलं. तुम्हाला दीर्घकाळासाठी तुरुंगात टाकलं जाईल. आता तर सौरभ दास आणि आशुतोष रांका केवळ एक आठवड्यासाठी आत गेले. आता अनेक महिन्यांसाठी त्यांना तुरुंगात जावं लागणार आहे. आता हे लोक तुरुंगात जायला घाबरत आहेत. त्यामुळे सीजेपी संपलीय. फिनिश झाली. त्यांच्या पाठीचा कणा तुटला आहे. पीस बॉन्ड सही करून संपले आहेत, असं ते म्हणाले.
एक जाईल, दुसरा येईल
सामान्य लोकांचं आयुष्मान कसं सुधारेल हाच राजकारणाचा हेतू असला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक पाऊल त्या दिशेनं पडलं पाहिजे. आधी सीजेपीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळी मी म्हटलं होतं एक शिक्षण मंत्री जाईल, दुसरा येईल. काय फरक पडेल? त्यामुळे लोकांचं आयुष्यमान उंचावेल? ते म्हणतात पेपर लीक होत आहे. त्यामुळे राजीनामा मागत आहोत. मी म्हटलं पेपर लीक होण्यामागचं कारण भ्रष्टाचार आहे. या सिस्टिममधून भ्रष्टाचार जाणार नाही. तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांना लाख हटवा. कायदा बनवला. पण तरीही पेपर लीक होतच राहणार. जोपर्यंत भ्रष्टाचार आहे, तोपर्यंत हे होतच राहणार. आता ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची त्यांनी मागणी केली. एक जाईल, पण दुसरा येईल. त्यामुळे काय जीवनस्तर उंचावणार आहे का? असा सवालही त्यांनी केला.
