
Captain Shambhavi Pathak: बारामती इथं काल झालेल्या विमान अपघाताने महाराष्ट्राचे उमदे नेतृत्व, राजकारणातील दादा व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हिरावले. राज्याला मोठा धक्का बसला. या विमानात इतर चौघांचा मृत्यू झाला. त्यात पायलट आणि कॅप्टन शांभवी पाठक हिचा मृत्यू झाला. तिचं आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न होतं. पण हे स्वप्न या अपघातानं कायमचं भंगलं. तिच्या मृ्त्यूची वार्ता धडकताच कुटुंब सैरभैर झाले. तिच्या कुटुंबांवर काळाने मोठा आघात केला.
दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव परिसरातील ए ब्लॉकमधील चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शांभवीचे कुटुंब राहते. त्यांच्या कुटुंबासाठी कालची सकाळ आघात करणारी ठरली. आज सकाळपासून तिच्या घरी नातेवाईकांची गर्दी होत आहे. सिव्हिल पायलट असलेली शांभवी पाठक आज त्यांच्यात नाही. बारामतीमधील विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्या विमानात इतरांसह शांभवी पाठक ही होती. असं काही घडेल हे तिच्या कुटुंबाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हते.
कुटुंबाच्या मनात अखेरपर्यंत ती खंत
या विमा अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात शांभवी पाठकचा समावेश होता. ती या विमानाची सह वैमानिक होती. तिच्या मृत्यूची बातमी कळताच आप्तस्वकीय, आप्तेष्ट, मित्र, इतर नातेवाईकांनी सकाळी तिच्या घराकडे धाव घेतली. गेल्या काही वर्षांपासून शांभवी ही सतत कामाच्या निमित्ताने व्यग्र होती. त्यामुळे ती फारशी घरी नसायची. ती सारखी ड्युटीवर असायची. तिच्याशी गेल्या काही दिवसांपासून मित्र, आप्तेष्टांचं बोलणंही झालं नव्हतं. कुटुंबातील काही सदस्यांचं आणि तिचही बोलणं झालं नव्हतं. त्यात तिच्या मृत्यूची बातमी धडकल्यानं अनेकांच्या काळजात धस्स झालं. तिच्याशी बोलणं न झाल्याची खंत आणि बोचणी सदस्यांना लागली आहे.
कुटुंब काही दिवसांपूर्वीच नवीन फ्लॅटमध्ये
येथील सुरक्षा रक्षकाने सांगितले की पाठक कुटुंब हे काही दिवसांपूर्वीच या फ्लॅटमध्ये आले. अजून या घरात काही सामान आणायचेही बाकी आहे. शांभवी हिला तिच्या वडिलांसोबत काही दिवसांपूर्वी पाहण्यात आले. तिचे वडील लष्करात होते. शांभवी ही वडिलांसोबत दिसली. त्यानंतर आता तिच्या मृत्यूची वार्ता आल्याने या इमारतीमधील अनेकांना धक्का बसला.
शांभवीचे शिक्षण दिल्ली येथील एअर फोर्स बाल भारती शाळेत झाले होते. तिने वैमानिकाचं प्रशिक्षण हे न्यूझीलंड येथे पूर्ण केले. तिने काही दिवस मध्य प्रदेशातील फ्लाईंग क्लबमध्ये काम केले. तिला आकाशाची ओढ होती. उंच भरारीची ओढ होती. पण तिचे स्वप्न या अपघाताने भंगले. तर कुटुंबावर मोठा आघात झाला.