
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अबू धाबी स्थित BAPS हिंदू मंदिराला भेट दिली, यावेळी त्यांनी या मंदिराचं कौतुक करताना हे मंदिर शांततेचं जागतिक प्रतिक असल्याचं म्हटलं आहे. हा एक मोठा चमत्कार आहे, या मंदिराला भेट देणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास अनुभव आहे, असं देखील चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. ब्रह्मविहारीदास स्वामी यांनी नायडू यांचं स्वागत केलं, तसेच यावेळी त्यांना मंदिरातील सुंदर कोरीव काम, आधुनिक तंत्रज्ञान आणि एकतेचा संदेश याबद्दल माहिती देखील देण्यात आली, चंद्रबाबू नायडू यांनी या मंदिराच्या स्थापत्य शैलीचं कौतुक करताना म्हटलं की, मंदिरात जुन्या परंपरा आणि नवीन तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे मेळ घालण्यात आला आहे की, आजच्या तरुण पिढीला ते सहज समजेल.
चंद्रबाबू नायडू यांनी या मंदिरात प्रार्थना केली, त्यानंतर त्यांनी ब्रह्मविहारीदास स्वामी यांच्या दृष्टीकोणाचं देखील कौतुक केलं आहे, ब्रह्मविहारीदास स्वामी यांच्या प्रयत्नामुळेच हे मंदिर तयार झालं. हा एक चमत्कारच आहे, इथे महान लोकांचे स्वप्न नेहमीच पूर्ण होतात, असंही यावेळी नायडू यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी यूएई सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याचं देखील कौतुक केलं आहे. दोन्ही देशांच्या सहकार्यामुळेच एवढी मोठी आणि भव्य वास्तू निर्माण होऊ शकली, हा एक असा वारसा आहे, ज्याला कायम लक्षात ठेवलं जाईल असंही यावेळी नायडू यांनी म्हटलं.
Andhra Pradesh Chief Minister, N. Chandrababu Naidu, Overwhelmed by the BAPS Hindu Mandir, Abu Dhabi, UAE https://t.co/1YETFPgF7d pic.twitter.com/jNVQqGb2Mb
— BAPS (@BAPS) October 24, 2025
यावेळी बोलताना नायडू यांनी म्हटलं की, फार थोडे लोक इतिहास घडवतात, मला तुमच्या व्यापक आणि दूरदर्शी दृष्टिकोनात ते दिसत आहे. तुम्ही परंपरांना आधुनिकतेशी, श्रद्धेला तंत्रज्ञानाशी आणि मानवतेला एकत्र आणणारा जो तुमचा दृष्टिकोण आहे, तो खरोखरच धर्माच्याही पलीकडे आहे. मी इथे जागतिक दृष्टीकोणाचा अनुभव घेतला आहे, ही एक असामान्य कामगिरी आहे, त्यासाठी मी तुमचं मनापासून कौतुक करतो, असं यावेळी चंद्रबाबू नायडू म्हणाले, ते तीन दिवसांच्या अबू धाबी दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी या मंदिराला भेट दिली.