ओबीसींच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, ओबीसी राष्ट्रीय परिषदेत भुजबळांची ग्वाही

देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असून ओबीसी बांधवांच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींना संविधानिक आरक्षण द्यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, ओबीसी राष्ट्रीय परिषदेत भुजबळांची ग्वाही
राष्ट्रीय ओबीसी परिषद
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 12:03 AM

दिल्ली : देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) धोक्यात आले असून ओबीसी बांधवांच्या हक्काचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी ओबीसींना संविधानिक आरक्षण द्यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. समृद्ध भारत फाउंडेशनच्या वतीने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे ओबीसी राष्ट्रीय परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डी राजा, खासदार कॅप्टन अजय यादव, खासदार शामसिंग यादव, माणिकराव ठाकरे, दिलीप मंडल, अरविंद कुमार, मनोज झा, समृद्ध भारतचे पुष्पराज देशपांडे, सुनील सरदार यांच्यासह समृद्ध भारत फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींना पंचायत राज संस्थांमध्ये राजकीय आरक्षण 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्तीने 1994 साली मिळाले. या राजकीय आरक्षणाची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी यासाठी महात्मा फुले समता परिषदेने तत्कालिन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेबांकडे पाठपुरावा केला व पवार साहेबांनी देखील महाराष्ट्रात ओबीसींना पंचायत राज संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद लागू केली. मात्र 11 मे, 2010 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने के. कृष्णमुर्ती निकाल दिला. या निवाडयातील अटींच्या पुर्ततेसाठी ओबीसींची जनसंख्या आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती समजणे आवश्यक ठरले. महात्मा फुले समता परिषदेने ताबडतोब 2010 सालीच यावर भुमिका घेतली व ओबीसी जनगणनेची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.

National OBC Conclave

दिल्लीत पॉलिटीकल लॉबिंग केले

त्याचबरोबर देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून मी ओबीसी जनगणनेवर त्यांनी स्पष्ट भुमिका घ्यावी असे पॉलिटीकल लॉबिंग दिल्लीत केले. त्यातून या विषयाच्या बाजूने सर्वपक्षीय अशा 100 पेक्षा जास्त खासदारांचा दबाव गट तयार झाला. दिनांक 6 जून, 2010 रोजी नाशिक चे तत्कालिन खासदार समीर भुजबळ यांनी लोकसभेत या प्रश्नावर चर्चा घडवून आणली होती. या ठरावाला भाजपाचे तत्कालिन उपगटनेते गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे मत विचारात न घेता संसदेत जाहीर पाठींबा दिला. तसेच या मागणीला तत्कालिन संसद सदस्य शरद यादव, मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, अजित सिंग, विरप्पा मोईली, वेलूनारायण सामी, व्ही. हनुमंतराव आदी दिग्गज नेत्यांनी पाठींबा दिला होता. त्यावेळी या विषयावर तीन दिवस लोकसभा व राज्य सभेचे कामकाज देखील स्थगित झाले होते. तसेच तत्कालिन कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात ओबीसी जनगणनेचा आग्रह धरला व अखेर तत्कालिन अर्थमंत्री स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांनी ऑगस्ट, 2010 मध्ये लोकसभेत ओबीसी जनगणनेचे आश्वासन दिले. त्यामुळे महात्मा फुले समता परिषदेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली असल्याचे सांगितले.

‘संपुर्ण देशच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या धक्क्याने ग्रस्त’

ते म्हणाले की, अनेक प्रयत्नानंतर जनगणनेची मागणी वर उल्लेख केल्याप्रमाणे मंजूर झाली. मात्र जनगणना आयुक्तांमार्फत ही जनगणना न करता, केंद्रीय ग्रामीण विकास व नागरी विकास खात्यांनी ओबीसींचा इंपिरिकल डाटा ( सामाजिक-आर्थिक परिस्थितीची माहिती ) जमा केला. हे काम 2011 ते 2016 याकाळात चालले त्यानंतर 2014 साली केंद्रात मोदीजींचे व राज्यात फडणवीसांचे सरकार आले. आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यावर देखील केंद्राने हा डेटा राज्याला उपलब्ध करुन दिला नाही. केंद्र सरकारने ह्या डेटा मध्ये चुका असल्याची माहीती सर्वोच्च न्यायालयाला दिली. मात्र चुका असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत का अशी विचारणा आम्ही केली. मात्र त्यावर केंद्राने काही उत्तर दिले नाही. काल मध्यप्रदेश येथील पंचायत राज मधले आरक्षण गेले आहे. लवकरच कर्नाटक, गुजरात उत्तरप्रदेश सह देशभरातील पंचायत राज संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द होणार आहे. आज संपुर्ण देशच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या धक्क्याने ग्रस्त आहे. देशभरातील ओबीसींना सामाजिक न्याय व घटनात्मक संरक्षण नाकारून कसे चालेल ? ओबीसींना घटनात्मक आरक्षण दिले तरच 54 टक्के असलेल्या या वर्गाला न्याय मिळेल, असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले.

इतर बातम्या :

Omicron : राज्यात अजून 11 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले, 825 कोरोना रुग्णांचीही नोंद

उद्धव ठाकरे चहापानाला गैरहजर, चंद्रकांत पाटील म्हणतात, आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या