चीनकडून तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवरील जगातील सर्वात मोठ्या धरणाचे काम सुरू, भारतावर काय परिणाम होणार?

चीनने आतापर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय जल करारावर स्वाक्षरी केलेली नाही. या परिस्थितीत चीनवर विश्वास ठेवणे कठीण आहे. चीन काय करू शकतो हे कोणालाही माहिती नाही, असा इशारा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी दिला आहे.

चीनकडून तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीवरील जगातील सर्वात मोठ्या धरणाचे काम सुरू, भारतावर काय परिणाम होणार?
| Updated on: Jul 20, 2025 | 9:15 AM

चीनने भारतीय सीमेजवळ तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर एक मोठा धरण बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला होता. आता चीननेही त्याची पायाभरणी केली आहे. या धरण प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभाला चीनचे पंतप्रधान ली कियांग उपस्थित होते. हा कार्यक्रम अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ असलेल्या तिबेटमधील न्यिंगची प्रदेशात झाला. या प्रकल्पावर चीन १६७ अब्ज डॉलर रुपये खर्च करणार आहे.

अरुणाचल प्रदेशातील मुख्यमंत्र्यांकडून चिंता

चीनकडून उभारण्यात येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणाबाबत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, चीन ब्रह्मपुत्र नदीवर ‘वॉटर बॉम्ब’ बांधत आहे. हा प्रकल्प भारताच्या सुरक्षेला आणि अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण करू शकतो. चीन या प्रकल्पावर सुमारे १६७ अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. यामध्ये पाच जलविद्युत केंद्रांचा समावेश आहे. चीनमधील यांग्त्झी नदीवर बांधलेल्या थ्री गॉर्जेस धरणाइतकी वीज या प्रकल्पातून निर्माण होईल.

भारताकडूनही चीनकडे प्रतिक्रिया

चीनने या प्रकल्पाला तिबेट प्रदेशाच्या विकासाशी आणि कार्बन न्यूट्रल होण्याच्या ध्येयाशी जोडले आहे. यामुळे तिबेटच्या स्थानिक वीज गरजा देखील पूर्ण होतील, असा दावा चीनकडून करण्यात आला आहे. दरम्यान, भारताने चीनच्या या प्रकल्पासंदर्भात जानेवारी महिन्यात चिंता व्यक्त केली होती.

ब्रह्मपुत्रा नदीवरील बांधण्यात येत असलेल्या धरणामुळे नदीच्या खालच्या भागात कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री चीनने करावी, असे आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला केले होते. प्रत्युत्तरादाखल चीनने दावा केला होता की हा प्रकल्प सुरक्षित आहे आणि कोणालाही त्यामुळे नुकसान होणार नाही. दरम्यान, मुख्यमंत्री खांडू म्हणाले की, चीनने आतापर्यंत कोणत्याही आंतरराष्ट्रीय जल करारावर स्वाक्षरी केलेली नाही. या परिस्थितीत चीनवर विश्वास ठेवणे कठीण आहे. चीन काय करू शकतो हे कोणालाही माहिती नाही, असा इशारा त्यांनी दिला.

भारतावर काय परिणाम होणार

चीन जगातील सर्वात मोठे धरण ब्रह्मपुत्रा नदीवर बांधत आहे. ही नदी भारताच्या विविध भागातून जाते. यामुळे या धरणाचा परिणाम भारतातील ईशान्येकडील राज्यांवर होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील भागात दुष्काळासारखी परिस्थिती होऊ शकते. चीनने नदीचे पाणी थांबवले किंवा तिचा प्रवाह बदलला तर भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पूर किंवा दुष्काळ यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. ब्रह्मपुत्रा नदी तिबेट उगम पावते. त्यानंतर भारत आणि बांगलादेशात जाते. त्यामुळे भारताप्रमाणे बांगलादेशवरही या धरणाचा परिणाम होणार आहे.