
जागतिक संरक्षण समुदायाचं भारताच्या ब्रह्मोस 2 मिसाइल कार्यक्रमावर लक्ष आहे. हे एक पुढच्या जनरेशनचं हायपरसोनिक क्रूझ मिसाइल आहे. भारत आणि रशिया मिळून ब्रह्मोस 2 क्षेपणास्त्र विकसित करत आहेत. वेग, अचूकता आणि लक्ष्यभेद या बाबतीत ब्रह्मोस 2 हे ब्रह्मोस 1 पेक्षा पण अधिक घातक असेल. सध्या भारतीय सैन्य दलांकडे असलेल्या ब्रह्मोस मिसाइलने ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तान विरुद्ध आपली क्षमता दाखवून दिली. पाकिस्तानला भारताचं हे मिसाइल अजिबात रोखता आलं नाही. ब्रह्मोसने पाकिस्तानी एअरफोर्सला सर्वाधिक दणका दिला. तिथल्या एअर बेसच्या धावपट्टया उखडून टाकल्या. संरक्षण तज्ज्ञांच्या मते ब्रह्मोस 2 ही भारताची खूप मोठी झेप असेल. चीन आणि पाकिस्तान या कुरापती शेजाऱ्यांचा विचार करता भारताला अशा मिसाइलची तातडीने आवश्यकता आहे. ब्रह्मोस 2 एकदा भारताच्या ताफ्यात आलं की, चीन-पाकिस्तानकडे पुढची 10 वर्ष तरी या मिसाइलला उत्तर नसेल.
ब्रह्मोस 2 चा ताशी वेग 8,500 किलोमीटर असेल. जगातील अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिमला चुकवण्यासाठी अशा प्रकारच्या हायपरसोनिक मिसाइलची डिझाइन करण्यात आली आहे. भारताकडे रशियाची S-400 ही सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. या सिस्टिमसाठी सुद्धा ब्रह्मोस 2 ला रोखणं एक आव्हान असेल. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी याच S-400 ने पाकिस्तानची अनेक मिसाइल्स हवेतच पाडली होती.
खोलवर स्ट्राइक करण्याची क्षमता
संरक्षण एक्सपर्ट्नुसार सध्या भारताकडे असलेलं ब्रह्मोस हे माच 2.8 ते माच 3 वेगाने आपल्या लक्ष्याच्या दिशेने झेपावतं. अत्यंत कमी उंचीवरुन उड्डाण करण्याच्या क्षमतेमुळे शत्रुच्या अत्याधुनिक रडार्सना सुद्धा या मिसाइलचा थांगपत्ता लागल नाही. या मिसाइलमध्ये दिशादर्शन प्रणाली आणि सॅटलाइट गायडन्स आहे. त्यामुळे अधिक अचूकतेने हे मिसाइल आपल्या लक्ष्यावर प्रहार करते. ब्रह्मोस 2 मध्ये भारत आणि रशिया मिळून मिसाइलची रेंज वाढवण्यावर काम करत आहेत. सध्या ब्राह्मोसची रेंज 290 किलोमीटर आहे. ब्रह्मोसच्या नव्या आवृत्तीमध्ये ही रेंज 450 किलोमीटर ते 900 किलोमीटरपर्यंत वाढवण्यावर काम सुरु आहे. त्यामुळे भारताची शत्रुच्या प्रदेशात खोलवर स्ट्राइक करण्याची क्षमता वाढणार आहे.
या मिसाइलला रोखणं कठीण का?
ब्रह्मोस 2 जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीतून हल्ला करण्यास सक्षम असेल. पुढची 10 वर्ष तरी शत्रुच्या रडारसाठी ब्रह्मोसला रोखणं एक कठीण आव्हान असेल. शत्रुने त्यांच्या रडारमध्ये सुधारणा केली. सेन्सर्स आणि अवकाशातून ट्रॅकिंग क्षमता वाढवली तरी ब्रह्मोसला रोखणं त्यांच्यासाठी सर्वात कठीण असेल. कारण या मिसाइलचा स्पीड आणि हवेतच दिशा बदलण्याची क्षमता यामुळे भारत, चीन-पाकिस्तानच्या एक पाऊल पुढेच असेल.