मोठी बातमी! अभिजीत दिपकेंना मारहाण, जयपूरमध्ये नेमकं काय घडलं?
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे, जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे, जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली आहे. आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणाने अभिजीत यांना एकामागून एक कानशिलात लगावल्या. या घटनेनंतर अभिजीत यांच्या समर्थकांनी तात्काळ संबंधित तरुणाला पकडले आणि त्याला मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.
जयपूरमधील आंदोलनावेळी हल्ला
समोर आलेल्या माहितीनुसार जयपूरमधील शहीद स्मारकावर कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते सोमवारी आंदोलन करत होते. याचदरम्यान पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी एका तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणाने अभिजीत दिपके यांच्या कानशिलात लगावल्या. हल्ल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यावेळी अभिजीत दिपके यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
आरोपीचा शोध सुरू
या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून हल्लेखोर तरुणाचा शोध सुरू केला आहे. या तरूणाने हल्ला का केला याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर आंदोलन
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, भरती परीक्षांमधील गैरव्यवहार आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक, पालक आणि महिलांनी सहभाग घेतला होता. मात्र या आंदोलनात मोठी गर्दी झाल्याने मोबाईल चोरीच्या घटनाही समोर आल्या आहेत. अनेकांनी आपले मोबाईल फोन हरवल्याची तक्रार केली. यानंतर आयोजकांनी व्यासपीठावरून नागरिकांना आपल्या मोबाईलसह मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच गर्दीत सक्रिय असलेल्या चोरट्यांपासून सावध राहण्याचा इशाराही देण्यात आला. या घटनांमुळे आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.