CM Nitish Kumar: केवळ 21 हजारांची रोख रक्कम,13 गायी, पाटण्यात नावावर घरही नाही, नितीश कुमार यांची संपत्ती किती?

CM Nitish Kumar Networth: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दरवर्षी त्यांच्या संपत्तीचे विवरण जाहीर करतात. बिहार सरकारच्या संकेतस्थळानुसार, त्यांची एकूण चल-अचल संपत्ती जवळपास 1.65 कोटी इतकी आहे.

CM Nitish Kumar: केवळ 21 हजारांची रोख रक्कम,13 गायी, पाटण्यात नावावर घरही नाही, नितीश कुमार यांची संपत्ती किती?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार
| Updated on: Nov 20, 2025 | 11:49 AM

CM Nitish Kumar Bihar: बिहारचे राजकारण हे नितीश कुमार यांच्या भोवती फिरते. ते गेल्या दोन दशकांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. ते आता 10 व्यांदा मुख्यमंत्री पदावर येतील. त्यांचे आयुष्य अगदी साधं आणि सोपं आहे. गेल्या दोन दशकांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही त्यांच्याकडे फारमोठी संपत्ती नसल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते अनेकदा आमदार, खासदार आणि केंद्रात मंत्री होते पण त्यांच्या जीवनशैलीत मोठा फरक पडला नाही.

दरवर्षी करतात संपत्तीचा खुलासा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार प्रत्येक वर्षी आपल्या संपत्तीचे विवरण सार्वजनिक करतात. बिहार सरकारच्या संकेतस्थळानुसार, गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी दिलेल्या विवरणानुसार, नितीश कुमार यांच्याकडे एकूण चल-अचल संपत्ती जवळपास 1.65 कोटी रुपये इतकी आहे. नितीश कुमार यांनी प्रत्येक मंत्र्याला त्याच्या संपत्तीचे विवरण दरवर्षी सादर करण्याचा नियम केला आहे. यामध्ये त्यांच्या कमाईचा स्त्रोत, त्यांच्यावरील कर्ज आणि वर्षभरातील व्यवहाराचे विवरण पत्र सादर करणे याचा समावेश आहे. संपत्ती जाहीर करणे अनिवार्य आहे.

काय काय आहे नितीश कुमार यांच्याकडे?

नितीश कुमार यांच्याकडे 13 गायी आणि 10 वासरं आहेत. त्यांच्याकडे एक फोर्ड इकोस्पोर्ट कार आहे. तर त्यांच्याकडे 21,052 रुपयांची रोख रक्कम आहे. तर विविध बँकांकडे जवळपास 60,811.56 रक्कम जमा आहे. चल संपत्तीची एकूण किंमत जवळपास 16,97,741.56 रुपये इतकी आहे.

दिल्लीत फ्लॅट, बिहारमध्ये जमीन

नितीश कुमार यांच्या अचल संपत्तीत सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतील द्वारका परिसरात त्यांचा एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट 1000 चौरस फुटाचा आहे. हा फ्लॅट त्यांनी 2004 मध्ये खरेदी केला होता. या सदनिकेशिवाय त्यांच्याकडील अचल संपत्तीची एकूण किंमत जवळपास 1.48 कोटी रुपये आहे. 2023 मध्ये त्यांची एकूण संपत्ती जवळपास 1.64 कोटी रुपये होती.

नितीश कुमार यांचा शपथविधी

आता थोड्यावेळापूर्वी 75 वर्षीय नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. पाटण्यातील गांधी मैदानावर हा सोहळा सुरू आहे. आज त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री आणि 20 आमदारही शपथ घेण्याची शक्यता आहे. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसले.