“तिच्या मृत्यूनंतर तो कायमचा बदलला..”; थलपती विजय यांच्या आईचा खुलासा

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते विजय हे कायम शांत का असतात, या प्रश्नाचं उत्तर आता त्यांच्या आईने दिलं आहे. आयुष्यातील एका खास व्यक्तीच्या मृत्यूनंतर ते कायमचे बदलले, असं त्यांनी सांगितलं.

तिच्या मृत्यूनंतर तो कायमचा बदलला..; थलपती विजय यांच्या आईचा खुलासा
थलपती विजय आणि त्यांची आई
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 23, 2026 | 3:38 PM

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांच्याबद्दल त्यांच्या आईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काही अशा गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत, ज्या फारच कमी लोकांना माहीत असतील. विजय हे नेहमी शांत आणि मितभाषी का असतात, ते मोकळेपणे लोकांमध्ये का मिसळत नाहीत, यामागील सर्वांत मोठं कारण त्यांची आई शोभा चंद्रशेकर यांनी सांगितलं आहे. “बहीण विद्याच्या मृत्यूनंतर विजय एकटाच राहू लागला. आम्ही परदेशात सहलीला गेलो तरी तो आम्हाला शॉपिंगसाठी बाहेर पाठवतो आणि स्वत: खोलीच एकटाच राहतो”, असं त्या म्हणाल्या.

‘थंथी टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत शोभा यांनी सांगितलं, “एक काळ असा होता जेव्हा माझे पती एस. ए. चंद्रशेखर हे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते आणि त्यांना कोणतेही पैसे मिळत नव्हते. त्यांना त्यांच्या कामासाठी फक्त जेवण आणि सेटवर येण्याजाण्याचा खर्च दिला जायचा. माझ्या पतीने पूर्णवेळ चित्रपट निर्मितीसाठी त्यांची सरकारी नोकरी सोडली होती. तोपर्यंत माझ्या गायनातून मिळणारं उत्पन्न हेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन होतं. विजय अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबात, साध्यासुध्या वातावरणात वाढला.”

“मला आणि माझ्या पतीला वाटलं होतं की तो डॉक्टर होईल. मुलीला गमावल्यानंतर ही इच्छा अधिकच प्रबळ झाली होती. मात्र त्यावेळी विजयचे वेगळे प्लॅन्स होते. वयाच्या 18 वर्षांपर्यंत त्याला पायलट व्हायचं होतं. त्यानंतर त्याने अभिनयविश्वात प्रवेश केला. पण जेव्हा विजयची धाकटी बहीण विद्याचं निधन झालं, तेव्हा सर्वकाही बदललं. त्यावेळी विद्या दोन वर्षांची होती. विद्या असेपर्यंत विजय खूप आनंदी आणि खेळकर स्वभावाचा होता. पण बहिणीच्या मृत्यूने त्याला आणि कुटुंबातील इतरांना बदलून टाकलं”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.

विजय यांचे बहिणीसोबतचे फोटो

चिमुकल्या विद्याने विजय यांच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला, असं म्हटलं जातं. त्या क्षणाने विजय खूप हादरून गेले होते. याविषयी आई शोभा म्हणाल्या, “अत्यंत बोलका आणि खोडकर असलेला विजय त्या घटनेनंतर अत्यंत शांत झाला. त्याच्या शाळेतल्या शिक्षकांच्याही हे लक्षात आलं होतं की वर्गात जेव्हा कधी त्याच्या बहिणीचा उल्लेख व्हायचा, तेव्हा तो भावूक व्हायचा. बहिणीच्या मृत्यूने विजयला इतका मोठा धक्का बसला की तो एकलकोंडा झाला. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, नातेवाईकांशीही बोलणं तो टाळू लागला.” बहिणीच्या स्मरणार्थ विजय यांनी त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव ‘विद्या विजय प्रॉडक्शन्स’ असं ठेवलं आहे.

Follow Us