ज्यांना बदल हवा त्यांनीच फक्त मला मतदान करा; शशी थरुरांनी आपली हुशारी दाखवली
ज्यांना पक्षात बदल हवा आहे, त्यांनीच फक्त मला मतदान करा असं शशी थरुरांनी नेत्यांना सांगितले आहे.

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक (Congress President Election 2022) जवळ येईल तसे पक्षातील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरूर यांनी एकमेकांवर निशाणा साधला आहे.
या दरम्यान, थरूर यांनी राष्ट्रपती निवडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ज्यांना पक्षात बदल हवा आहे, त्यांनीच फक्त मला मतदान करावे.
बाकी काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत चालले आहे असे ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी मला मत देऊ नये अशा स्पष्ट शब्दात त्यांनी नेत्यांना सांगितले आहे. यावेळी खर्गें सांगितलेल्या संघर्षाच्या कहाणीवर त्यांनी निशाणा साधत जोरदार प्रत्युत्तर दिले.
2014 आणि 2019 मध्ये ज्यांनी आम्हाला मतदान केले नाही त्यांनी आमच्यासोबत यावे, असंही थरूर यांनी यावेळी सांगितले. ही निवडणूक मी का लढवत आहे हे सांगताना ते म्हणाले की, मला पक्षात बदल घडवायचा असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
मल्लिकार्जुन खर्गे यांची खिल्ली उडवत थरूर म्हणाले की, ते जर संघर्ष करुन इथपर्यंत आले असतील मग आम्ही काय पॅराशूटने इथपर्यंत आलो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीमधून आपण तीन वेळा विजयी झाल्याचे सांगत खर्गेंना त्यांच्या झालेल्या पराभवाचीही त्यांनी आठवण करुन दिली.
