
Cough Syrup Death : मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणइ राजस्थानमधील भरतपूर आणि सिकर येथे कफ सिरपचे औषध घेतल्याने एकूण 12 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या वृत्तामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आता लहान मुलाला खोकला लागल्यास कोणते औषध द्यावे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच कफ सिरप हे औषध किती वर्षांपर्यंतच्या मुलांना देणे योग्य आहे? असाही सवाल विचारला जातोय. दरम्यान, आता या हा सर्व संभ्रम निर्माण झालेला असताना केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. या सूचनांमध्ये कोणते औषध घ्यावे आणि पालकांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने कफ सिरप या औषधासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना देशातील सर्वच राज्यांना देण्यात आल्या आहेत. लहान मुलांना खोकला लागला असेल तर विचार करूनच औषध द्या, असे यात सांगण्यात आले आहे. तसेच बहुसंख्य लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला हे आजार आपोआप बरे होते. त्यांना औषध देण्याची गरज नसते, असे या मार्गदर्शक सूचनांत सांगण्यात आले आहे. सोबतच 2 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना कफ सिरप हे औषध देऊ नये, अशा स्पष्ट सूचना केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.
केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पाच वर्षांपेक्षा लहान मुलांनाही कफ सिरप हे औषध दिले जात नाही. तसेच पाच वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे औषध दिले जाते. हे औषध देताना त्याचे प्रमाण कमीत कमी कसे राहील याकडे डॉक्टर लक्ष ठेवतात. त्यामुळे मुलांना खोकला-सर्दी असा त्रास जाणवत असेल तर पाणी पाजणे, बाळाला आराम करू देणे असे काही घरगुती उपया करावेत, असेही या मार्गदर्शक सूचनांत सांगितलेले आहे.
सोबतच केंद्र सरकारने रुग्णालये, औषधालयने तसेच आरोग्य केंद्रांनाही काही सूचना दिल्या आहेत. गुड मॅन्यूफॅक्चरिंग प्रॅक्टिस अंतर्गत तयार करण्यात आलेली औषधंच लहान मुलांना द्यावीत. या मार्गदर्शक सूचना शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावीत, असेही केंद्र सरकारने सांगितले आहे.