
भोपाळ : भारतात आंदोलनं आणि आणि निषेध करण्याची वेगवेळी पद्धत ही कायमच चर्चेचा विषय असतो. मात्र एका आमदारानं गळ्यात चक्क सुतळी बाँबची माळ घालत विधानसभेत प्रवेश केल्यानं सगळ्यांचीच तंतरली. हरदाचे काँग्रेस आमदार राम किशोर डोगणे बनावट बॉम्बचा हार घालून विधानसभेत पोहोचले. फटाका कारखान्यात (Cracker Factory Blast) झालेल्या स्फोटाबाबत विरोधी पक्षाच्या आमदारांनी गांधी पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. 4 लाखांची भरपाई आणि कलेक्टर एसपी यांना हटवून काहीही होणार नाही, असे सांगितले. हरदा फटाका कारखान्याच्या स्फोटानंतर राज्य सरकारने जिल्हाधिकारी ऋषी गर्ग यांना हटवले आहे. त्याचवेळी एसपी संजीव कुमार कांचन यांना हटवून भोपाळ मुख्यालयात पाठवण्यात आले आहे.
काँग्रेसचे आमदार डोगणे म्हणाले, ”दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. हा कारखाना भाजप नेते कमल पटेल यांच्या आश्रयाने चालत होता. जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने संवेदनशीलता दाखवावी. दुसरीकडे, माजी कृषी मंत्री कमल पटेल म्हणतात की, आरोपी फटाके कारखान्याचे मालक राजू आणि मुन्ना पटेलचा भाऊ मॅनी यांना काँग्रेस आमदार आरके डोगणे यांचे संरक्षण आहे.”
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बुधवारी हरदा येथील जिल्हा रूग्णालयात पोहोचून फटाक्यांच्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेऊन त्यांची प्रकृती जाणून घेतली. अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना डॉ.यादव यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिल्या. या संकटाच्या काळात सरकार पीडितांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी जखमींना दिली. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल.
अपघातात त्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे जखमींनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना सांगितले. गुरेही ठार झाली आहेत. मुख्यमंत्री डॉ.यादव यांनी हरदा जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त घरांची यादी करून बाधित कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. जखमी गुरांवर चांगले उपचार केले जातील, असे त्यांनी सांगितले. मृत गुरांची नुकसान भरपाई देखील बाधित लोकांना दिली जाईल.
गोविंद मूलचंद चंदेल, हेमंत दिनेश, असगर सज्जाद हुसेन, युसूफ अख्तर आणि घनश्याम नर्मदा प्रसाद या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 5 जणांना प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांनी वितरित केला. इतर जखमींना 25-25 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. मुख्यमंत्री डॉ.यादव यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबीयांना आश्वासन देताना ते म्हणाले की, याशिवाय सर्वतोपरी मदत केली जाईल.