
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांचा ‘वीर-झारा’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. या चित्रपटात एका भारतीय व्यक्ती पाकिस्तानी महिलेच्या प्रेम पडला होता. वास्तविक जीवनात ही कहाणी पुन्हा समोर आली आहे. सीआरपीएफ जवानाला पाकिस्तानातील मिनल खान या महिलेशी प्रेम झाले, परंतु आता दोघांना वेगळे व्हावे लागले आहे. यानंतर आता जवानाच्या अडचणी आणखी वाढत आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने पाकिस्तानला खरा चेहरा दाखवत कठोर पावले उचलली. भारताने देशात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा आदेश जारी केला. यानंतर सीआरपीएफ जवान मुनीर अहमद यांच्या पत्नीलाही पतीला सोडून पाकिस्तानला परत जावे लागले आहे.
वाचा: ‘याचा अर्थ तुम्ही नालायक…’, पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य करताना शाहिद आफ्रीदीने ओलांडल्या मर्यादा
नोकरीवर धोका
मिनल खान आणि मुनीर खान यांनी २०२४ मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्न केले होते. भारताने कारवाई केल्यानंतर मिनल खान यांना देश सोडून जावे लागले आहे. पत्नी देश सोडून गेली असताना, दुसरीकडे मुनीर खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत आणि आता त्यांच्या नोकरीवर धोका निर्माण झाला आहे. खरेतर, सीआरपीएफ जवान मुनीर खान यांच्याविरुद्ध विभागीय कारवाई सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कॉन्स्टेबल मुनीर खान यांनी पाकिस्तानी नागरिकाशी औपचारिक परवानगीशिवाय लग्न केले, यामुळे प्रक्रियात्मक उल्लंघन (procedural violation) आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात गंभीर चिंता निर्माण झाल्या आहेत. यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
सीआरपीएफने सांगितले की, सध्या ४१व्या बटालियनमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलने मिनल खान नावाच्या पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, विभागाने प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी किंवा मंजुरी देण्यापूर्वी, २४ मे २०२४ रोजी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी निकाह (लग्न) केल्याचा आरोप आहे. परवानगीशिवाय केलेल्या या लग्नामुळे आता त्यांच्यावर शिस्तभंगाची प्रक्रिया (disciplinary process) सुरू झाली आहे.
व्हिसाची मुदत संपल्यानंतरही पत्नीला देशात ठेवले
समोर आलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबलच्या जबाबातही अनेक त्रुटी आढळल्या. अहवालात म्हटले आहे की, मुनीर खान यांच्या पत्नीचा व्हिसा संपल्यानंतरही त्यांनी पत्नीला भारतात ठेवले आणि ही बाब सर्वांपासून लपवली.
मुनीर खान यांची पत्नी मिनल खान पर्यटक व्हिसावर वाघा सीमेवरून भारतात दाखल झाली होती. हा पर्यटक व्हिसा २२/०३/२०२५ पर्यंत वैध होता, परंतु व्हिसाची वैधता संपल्यानंतरही मुनीर खान यांनी पत्नीला भारतात ठेवले आणि याची माहिती कोणालाही दिली नाही.
मिनल यांना निर्वासित केले गेले नाही
सीआरपीएफने सांगितले की, कॉन्स्टेबलने सीसीएस (आचरण) नियम, १९६४ च्या नियम २१(३) अंतर्गत आचरण नियमांचे उल्लंघन केले आहे आणि आता विभागीय शिस्तभंगाची कारवाई विचाराधीन आहे. अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि सर्व पाकिस्तानी नागरिकांना निर्वासित करण्याच्या भारत सरकारच्या आदेशानंतर मिनल खान यांना वाघा सीमेवरून भारतातून निर्वासित करण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र, सीआरपीएफ जवानाशी लग्न केलेल्या पाकिस्तानी नागरिक मिनल खान यांना जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने बुधवारी निर्वासनापासून अंतिम क्षणी १० दिवसांची सवलत दिली आहे.