
अहमदाबाद : सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली नसली तरी बिपरजॉय या चक्रीवादळाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून किनारपट्टीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात राज्याला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वादळामुळे 1700 हून अधिक गावे, 75 किनारी शहरे आणि 41 बंदरांची स्थिती धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर 35 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर लाखो मच्छिमारांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
परंतु 25 टक्के लोकसंख्या गुजरातमधील किनारपट्टीजवळ राहत असल्यामुळे प्रशासनाकडून आता सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दोन वर्षांपूर्वीही गुजरातला वादळाने मोठा फटका बसला होता. या वादळात 67 जणांचा मृत्यू झाला होता. तर 8 हजार 500 हून अधिक जनावरांचा वादळात मृत्यू झाला होता. बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर, गुजरातने ओडिशापासून धडा घेतला पाहिजे असं मत हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. कारण किनार पट्टीवर संकटं कोसळले तर ओडिशासारखे राज्य काय काय उपाय योजना करते हे बघणे महत्वाचे आहे.
चक्रीवादळांबाबत दोन राज्यांची तुलना करताना जीके भट्ट यांनी सांगितले की, ओडिशाला सगळ्यात जास्त चक्रीवादळांचा सामना करण्याचा अनुभव आहे. तर ओडिशाच्या तुलनेत गुजरातमध्ये त्या राज्यासारखी परिस्थिती धोक्याची नाही. त्यामुळे केवळ चांगल्या पायाभूत सुविधांचा मुद्दा नसून आपत्ती व्यवस्थापनाचीही गरज आहे. त्यामुळे गुजरात इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना सुमारे दहा वर्षापूर्वीच करण्यात आल्याचे सांगण्या आले आहे.
हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी सांगितले की, बिपरजॉयसारखी वादळाची परिस्थिती निर्माण होण्याआधीच आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केली गेली पाहिजे. कारण वारंवार गुजरात किनारपट्टीला वादळी वाऱ्याचा प्रचंड मोठा फटका बसत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.