पाकिस्तानवरील अॅक्शनची ब्ल्यू प्रिंट तयार? दिल्लीत मोठ्या घडामोडी; मोदींची संरक्षण सचिवासोबत हायलेव्हल मिटिंग
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला तोंड देण्यासाठी लष्करी तयारी वाढवली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. पाकिस्तानने अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली असली तरी त्यांच्याकडे पुरेसे शस्त्रास्त्र नाहीत. भारताची तयारी पाहून पाकिस्तान घाबरला आहे आणि एलओसीवर सतत अग्नी शस्त्रांचा वापर करत आहे.

पहलगाम हल्ला झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हवाई दल प्रमुखांशी 40 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर आता थेट संरक्षण सचिवांशी मोदींची बैठक सुरू आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्यासोबत ही बैठक सुरू आहे. या बैठकीला हवाई दलाचे सीनिअर अधिकारीही उपस्थित होते. काही वेळा पूर्वी हे अधिकारी पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडले आहेत. मात्र, संरक्षण सचिवांशी अजूनही चर्चाच सुरू असल्याने या बैठकीत मोठा निर्णय होणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भारताने पाकिस्तानवरील अॅक्शनची ब्ल्यू प्रिंटच तयार केल्याचं सांगितलं जात आहे. भारताच्या मिसाईल परीक्षण, अरबी समुद्रातील युद्धाभ्यास आणि लढाऊ जहाजांच्या तैनातीमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्यामुळेच पाकिस्तान घाबरला असून वाट्टेल ती बडबड करत आहे. पाकिस्तानी फौजांवर पाकिस्तानी नेत्यांचं नियंत्रण राहिलेलं नाही. पण पाकिस्तानी नेते आणि दुतावासातील लोक एकापेक्षा एक बिनबुडाची विधाने करत आहेत.
मोदींनी आधीच लष्कराला मोकळीक दिली आहे. टाइम आणि टार्गेट फिक्स करण्याचे आदेश मोदींनी सैन्याला दिले आहेत. त्यानंतर एलओसीवर तैनात असलेले बीएसएफ पाकिस्तानच्या फायरिंगला जशास तसे उत्तर देत आहे. दुसरीकडे पाकिस्तान सातत्याने सीजफायरचं उल्लंघन करत आहे. तिथेही पाकिस्तान तोंडघशी पडताना दिसत आहे.
चार दिवसही युद्ध करू शकत नाही
पाकिस्तानचे रशियातील राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची पोकळ धमकी दिली आहे. तर भीतीच्या छायेखाली असलेले पाकिस्तानी रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनीही भारताला यापूर्वीच अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तान केवळ युद्धाची धमकी देत आहे. पण वास्तवात युद्ध झालं तर पाकिस्तान चार दिवसही युद्धात राहू शकणार नाही. त्यांच्याकडे तेवढा दारूगोळाच नाहीये. त्यांनी पैसे कमावण्यासाठी युक्रेनला हत्यारे विकली आहे. तर पाकिस्तानच्या शस्त्रसाठा निर्माण करणाऱ्या फॅक्ट्रीची क्षमताही यथातथाच आहे.
पैशावर सैन्याचा डल्ला
पाकिस्तान उपासमारीला सामोरे जात आहे. पीठासाठी लूट होत होती तेव्हा पाकिस्तानने लपूनछपून हत्यारे विकली. शस्त्र विक्रीतून आलेल्या पैशातील 80 टक्के हिस्सा पाकिस्तानी सैन्याने आपल्याकडे ठेवला. पाकिस्तानने 2023मध्ये 42 हजार रॉकेट, 60 हजार हॉवित्जर तोफा, एक लाख 30 हजार 122 एमएम रॉकेट यूक्रेनला लपूनछपून विकले आहेत.
पाकिस्तानी सैन्याकडे लढण्यासाठीची हत्यारे नाहीत. पण तरीही भारत आमच्यावर हल्ला करेल असा अपप्रचार त्यांनी सुरू केला आहे. पाकिस्तानी सैन्य घाबरलं आहे. गेल्या दहा दिवसांपासून रोज पाकिस्तानकडून एलओसीवर फायरिंग केली जात आहे. भारत प्रत्युत्तर देण्याची भीती असल्यानेच पाकिस्तानने सीज फायरिंगचं उल्लंघन सुरू केलं आहे. भारतीय सैन्याची तयारी पाहूनच पाकिस्तानला धडकी भरली आहे.
