Delhi Blast : ‘मेजवाणीसाठी बिर्याणी…’, दहशतवाद्यांचा मृत्यूचा कोडवर्ड समोर, चॅट बॉक्समध्ये अजून काय काय?

Delhi Blast Terrorists Code Word : दिल्ली स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर या सर्व हल्ल्याचे धागेदोरे हे पाकिस्तानपर्यंत पोहचत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान हा स्फोट करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी काही कोडवर्ड वापरले, चॅटबॉक्समधून मोठा खुलासा

Delhi Blast : मेजवाणीसाठी बिर्याणी..., दहशतवाद्यांचा मृत्यूचा कोडवर्ड समोर, चॅट बॉक्समध्ये अजून काय काय?
दिल्ली स्फोट
| Updated on: Nov 13, 2025 | 10:41 AM

Delhi Blast Update: दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळील मोठ्या स्फोटाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी एका आय-20 कारमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 12 लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हा कट रचण्यात आला. या कटामध्ये केवळ पाच सहा जणांचा समावेश नाही तर एक मोठे नेटवर्क आणि स्लीपर सेल असल्याचे प्राथमिक तापसात समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याची पाळंमुळं खोदून काढत आहेत. दहशतवाद्यांनी या स्फोटासाठी कोडवर्ड वापरल्याचे समोर आले आहे. हे कोडवर्ड अत्यंत साधारण वाटतात. पण त्यातूनच अनेकांच्या मृत्यूचा कट हे दहशतवादी आखत होते.

कोडवर्ड्समध्ये दडला मृत्यूचा कट

‘मेजवाणीसाठी बिर्याणी तयार आहे’ असा एक संदेश यंत्रणांना दिसला. हा एकदम साधारण मॅसेज वाटेल. पण हाच मृत्यूचा सांगावा असल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या हाती या दहशतवाद्यांचा डिजिटल चॅटबॉक्स लागला आहे. त्यात या आरोपींनी संपूर्ण कटासाठी कोडवर्ड्स वापरल्याचे समोर आले आहे. त्यात मेजवाणी म्हणजे धमका अथवा स्फोट आहे. तर बिर्याणी याचा अर्थ स्फोटासाठीचे साहित्य असा आहे. सुरक्षा यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी हे कोडवर्ड वापरण्यात आले. तर पोलिसांना एक डायरी पण सापडली आहे. त्यात ऑपरेशन हा शब्द अनेकदा वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. NIA च्या डिजिटल फॉरेन्सिक लॅबमध्ये हे कोड डीकोड करण्यात येत आहेत. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

NIA आणि सायबर सेल सक्रीय

दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील कार स्फोट हे एक संघटित कृत्य असल्याचे आणि हे दहशतवादी मॉड्यूल असल्याचे तपासात समोर आले आहे. Jaish-e-Mohammed या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी डॉक्टर डी गँगचा थेट संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तपासाची सूत्रं हाती घेतली आहे. सायबर सेल आता चॅटबॉक्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांआधारे या संघटित कृत्यातील इतर सदस्यांचा शोध घेत आहे. दिल्ली पोलीस, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी आतापर्यंत अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली आणि परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जखमींवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केंद्र सरकारने हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे. तर आता या कटातील इतर सदस्यांचा शोध सुरू झाला आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्रापर्यंत या स्लीपर सेलचे धागेदोर असल्याचे समोर येत आहे. त्यादृष्टीने पोलीस, एटीएसची छापेमारी सुरू आहे. त्यात अजून काही सदस्यांना अटक होण्याची शक्यता आहे.