Delhi Blast : घरात लग्नाची धामधूम, पण त्याचे मनसुबे वेगळेच, नवरदेवाऐवजी डॉ. उमर का झाला मानवी बॉम्ब, मोठे कारण समोर
Delhi Blast Umar Mohammad : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा पुन्हा चर्चेत आले आहे. या भागातील कोईल येथील गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. येथील तरुण वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. उमर नबी हा सुसाईड बॉमर ठरला आहे. डॉ. उमर असा आला जैश-ए-मोहम्मदच्या जाळ्यात...

Lal Kila Blast : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा भागातील कोईल या गावातील स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. या गावात 29 वर्षीय डॉक्टर उमर उन नबी याचे दोन मजली घरी आहे. डॉ. उमर नबी हा लाल किल्ल्याजवळील स्फोट झालेली कार चालवत असल्याचे समोर येत आहे. त्याच्या लग्नाची घरात धामधूम असतानाच त्याच्या मनात काही वेगळेच होते. जैश-ए-मोहम्मदने त्याचा ब्रेन वॉश केल्याचे समोर आले आहे. त्याच्या आईचे आणि त्याचे डीएनए जुळले आहेत. पकडल्या जाण्याच्या भीतीने उमरने हा स्फोट केला आहे. एक हुशार डॉक्टर असा झाला मानवी बॉम्ब…
UPSC करणाऱ्या तरुणीशी लग्नाचा बेत
पुलवामा हा काश्मीरमधील अति संवेदनशील जिल्हा मानल्या जातो. अशा परिस्थितीतही डॉ. उमर याची शैक्षणिक वाटचाल चांगली होती. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत चांगला आहे. त्याने अनेक कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्याने श्रीनगर येथील प्रतिष्ठित सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण पूर्ण केले. त्याने श्रीनगर येथील सरकारी रुग्णालय SMHS आणि JMC अनंतनाग येथे त्याने काम केले. त्यानंतर त्याने फरीदाबाद येथील अल फलाह महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम सुरु केले. त्याचवेळी त्याच्या घरात त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. युपीएससी करणारी एक तरुणीही घरांच्या आणि उमरच्या पसंतीला पडली. ही तरुणी श्रीनगरमधील हैदरपुरा येथील आहे. घरात याचीच धामधूम सुरू असताना उमरचे मनसुबे मात्र वेगळेच असल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी या तरुणीच्या घरी सुद्धा चौकशी सुरू केली आहे.
कुटुंबच चौकशीच्या फेऱ्यात
उमरच्या नातेवाईकांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी उमरच्या घरातील दोन सदस्यांना सोबत नेले. त्यांचे सर्व मोबाईल नेण्यात आले. उमरची वहिणी मुजम्मिला अख्तरने सांगितले की तिचा दिर जहुर इलाही याला पोलीस घेऊन गेले आहे. तर नंतर पती आशिक हुसेन भट याला पण पोलिसांनी चौकशीसाठी सोबत नेले. मुजम्मिला अख्तर हिने सांगितले की, गेल्या शुक्रवारी त्याच्याशी कुटुंबाने अखेरचा संपर्क केला होता. त्यावेळी आपण तीन दिवसात घरी येत असल्याची माहिती उमरने दिली होती.
या स्फोट प्रकरणात इतर जे आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यांचा आणि उमरचा अनंतनाग येथून संपर्क असल्याची माहिती समोर येत आहेत. या स्फोटात आतापर्यंत अटक करण्यात आलेले डॉक्टर हे जम्मू आणि काश्मीरमधील अधिक आहेत. त्यात काही जण तर जैश-ए-मोहम्मदचे सदस्य आहेत. त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर उमरचा ब्रेन वॉश केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरचा बदल घेण्यासाठी हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.
