Arvind Kejriwal : मी जस्टिस स्वर्णकांता यांच्या कोर्टात जाणार नाही, अरविंद केजरीवाल यांच्याकडून सत्याग्रहाची घोषणा

Arvind Kejriwal : मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे जस्टिस स्वर्णकांता शर्मा यांच्या कोर्टात जायला तयार नाहीत. त्यांनी सत्याग्रहाची घोषणा केली आहे.

Arvind Kejriwal : मी जस्टिस स्वर्णकांता यांच्या कोर्टात जाणार नाही, अरविंद केजरीवाल यांच्याकडून सत्याग्रहाची घोषणा
Arvind Kejriwal-justice swarana kanta sharma
| Updated on: Apr 27, 2026 | 10:52 AM

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची मद्य घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरोधात तपास यंत्रणेने दिल्ली उच्च न्यायालयत अपील केलं. दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांचं खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. आता अरविंद केजरीवाल यांनी जस्टिस स्वर्णकांता शर्मा यांच्या कोर्टात हजर होणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यांनी या संदर्भात जस्टिस स्वर्णकांता शर्मा यांना पत्र लिहिलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी जस्टिस स्वर्णकांता यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘ते स्वत: किंवा वकिलाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर हजर होणार नाहीत’ ‘जस्टिस स्वर्णकांता यांच्याकडून न्याय मिळण्याची माझी अपेक्षा संपली आहे’ असं ते म्हणाले. म्हणून महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गावर चालण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. आम आदमी पार्टीचे ते राष्ट्रीय संयोजकही आहेत. जस्टिस स्वर्णकांता यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार मी माझ्याकडे राखून ठेवला आहे असही ते म्हणाले. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन बेंच बदलण्याचं अपील केलं होतं. त्यांनी जस्टिस स्वर्णकांता शर्मा यांना या केसची सुनावणी बंद करण्याच आवाहन केलं होतं.

केजरीवालांचा जस्टिस स्वर्णकांता यांना विरोध का?

जस्टिस शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिवक्ता परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा हवाला देत अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘न्यायाधीश जर त्या विचारधारेचा समर्थक आहे आणि मी विरोधक, तर मला न्याय कसा मिळेल?’ या प्रकरणात कायदेशीर लढाईऐवजी आपण नैतिक आणि वैचारिक विरोधाच्या मार्गाने जाणार आहोत असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

स्वर्ण कांता शर्मा काय म्हणाल्या?

“फक्त शंकेच्या आधारावर कोणालाही कोर्टाकडून दिलासा मिळणार नाही. कुठलाही जज कुठल्याही प्रकरणापासून स्वत:ला वेगळं करु शकत नाही” असं न्यायाधीश शर्मा म्हणाल्या. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावली. “केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाही, तर ते बोलणार की, अशा निर्णयाची मी आधीच भविष्यवाणी केली होती. तेच उद्या दिलासा मिळाला तर कोर्टाने दबावाखाली निर्णय दिला असही ते बोलू शकतात” असं स्वर्ण कांता शर्मा म्हणाल्या.

 

Follow Us