Delhi Fire : अचानक मोठा आवाज आला, सर्वजण गच्चीच्या दिशेने पळाले अन् तिथेच… शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहाटेच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली.

Delhi Fire : अचानक मोठा आवाज आला, सर्वजण गच्चीच्या दिशेने पळाले अन् तिथेच... शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?
delhi fire update
| Updated on: May 03, 2026 | 10:54 AM

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. दिल्लीच्या विवेक विहार परिसरातील एका इमारतीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पहाटेच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी अग्निशमन दलाला १२ पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे. आता ही घटना नेमकी कशी घडली, याबद्दल काही प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३.४७ च्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला आग लागल्याची पहिली माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने १४ अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये एसीचा भीषण स्फोट झाला. यानंतर काही क्षणांत ही आग संपूर्ण मजल्यावर पसरली. यावेळी धुराचे लोट इतके होते की इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नाही.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाला?

या घटनेच्या वेळी परिसरात उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी अंगावर काटा आणणारा थरार सांगितला. या इमारतीच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सर्वत्र शांतता असताना अचानक एक मोठा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण परिसर हादरला. आम्ही सर्वजण त्या आवाजाने घराबाहेर आलो, तेव्हा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून मोठी आग लागल्याचे दिसले. यावेळी आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर येत होते. त्यासोबतच इमारतीत अडकलेले लोक मदतीसाठी आरडाआरोड करत होते. पण आग इतकी भीषण होती की कोणालाही आत शिरणे शक्य झाले नाही.

गच्चीचा बंद दरवाज्याने घात केला…

या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण इमारतीची रचना आणि गच्चीचा बंद ठेवलेला दरवाजा असल्याचे बोललं जात आहे. तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी गच्चीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने गच्चीचा दरवाजा बाहेरच्या बाजूने कडी लावून बंद करण्यात आला होता. दुसरीकडे आग मोठ्या प्रमाणात भडकत होती. तसेच धुराचे लोटही पसरले होते आणि त्यामुळे हे नागरिक तिथेच अडकले. त्या सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला.

यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत प्रवेश केल्यावर तीन जणांचे मृतदेह चक्क बेडवर आढळले. यावरुन त्या तिघांनाही  सावरण्याची किंवा पळण्याची साधी संधीही मिळाली नसावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवली जात आहे.

कुलिंग ऑपरेशन सुरु

दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धुराच्या विळख्यातून १२ पेक्षा जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. जखमी झालेल्या ४ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या इमारतीत कूलिंग ऑपरेशन सुरू असून पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. या दुर्घटनेतील मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने जळाले आहेत की त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए (DNA) चाचणीची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासात एसी ब्लास्ट हेच आगीचे कारण असल्याचे समोर येत असले तरी, पोलीस सर्व अंगांनी तपास करत आहेत.

Follow Us