Delimitation Bill : मोठी बातमी! डीलिमिटेशन विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, 50 टक्के जागा वाढणार
केंद्रीय कॅबिनेटने आज डीलिमिटेशन विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लोकसभेच्या जागा वाढणार असून ही व्यवस्था 2051 पर्यंत लागू राहणार आहे. या विधेयकाला अनेक पक्षांनी विरोध दर्शवला, तर काहींनी अटींवर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लोकसभेत हे विधेयक आल्यावर त्याला मंजुरी मिळते की नाही? हे पाहावं लागणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने डीलिमिटेशनच्या माध्यमातून महिला आरक्षण देणाऱ्या संविधान दुरुस्ती विधेयकाला अखेर मंजुरी दिली आहे. या अंतर्गत सर्व राज्यातील लोकसभेच्या जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढणार आहे. ही व्यवस्था 2051 पर्यंत लागू राहणार आहे. केंद्र सरकारने येत्या 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेचं अधिवेशन बोलावलं आहे. डीलिमिटेशन विधेयक आधी लोकसभेत सादर केलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र, कॅबिनेटच्या बैठकीतच त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने या विधेयकासाठीच अधिवेशन बोलावण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
अनेक राजकीय पक्षांनी डीलिमिटेशन बिलाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. समाजावादी पार्टीने या विधेयकाला विरोध केला आहे. तर डीएमके आणि बीआरएसने काही अटींवर विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर काँग्रेसने हे विधेयक म्हणजे संविधानावर अघात असल्याचं म्हटलं आहे.
पहिला प्रयत्न अपयशी
सरकारने एप्रिलमध्ये डीलिमिटेशन बिल आणि महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोन तृतियांश बहुमत नसल्याने हे बिल मंजूर होऊ शकलं नाही. मात्र, आता भाजपने संपूर्ण होमवर्क केला आहे. राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर होईल, अशी सरकारला आशा आहे. त्यामुळेच सरकारने तातडीने अधिवेशन बोलावलं असून आज या विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरीही दिली आहे.
परिस्थिती बदलली, डाव टाकला
गेल्या सात महिन्यात राजकीय समीरकरणे बरीच बदलली आहेत. ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात आले आहेत. टीएमसीच्या खासदारांनी बंड केलं आहे. डीएमके इंडिया आघाडीतून बाहेर पडली आहे. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिकाही काठावरची आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा नवा डाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कितपत यश मिळेल हे येत्या आठवड्यातच स्पष्ट होणार आहे.
इंडिया ब्लॉक शनिवारी बसणार
दरम्यान, संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने उद्या शनिवारी बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत परिसीमन विधेयकाला पाठिंबा न देण्याबाबतची रणनीती ठरवली जाणार आहे. उद्या सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला कोणते कोणते पक्ष उपस्थित राहतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रतिनिधी बैठकीला येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.