DGCA ची मोठी कारवाई, एअर इंडियाला मोठा धक्का, वाचा…
एअर इंडियाला मोठा धक्का बसला आहे. विमान वाहतूक सुरक्षा नियामक डीजीसीएने एअर इंडियाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एअर इंडिया एअरलाइन्स गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय बनली आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले होते, त्यानंतर इतर काही शहरांमधील अनेक उड्डाणे तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आली होती. अशातच आता एअर इंडियाला मोठा धक्का बसला आहे. डीजीसीएने एअर इंडियाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
डीजीसीएची मोठी कारवाई
विमान वाहतूक सुरक्षा नियामक डीजीसीएने एअर इंडियाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. गंभीर त्रुटी आढळल्याने क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात एका विभागीय उपाध्यक्षाचाही समावेश आहे. डीजीसीएने 20 जून रोजी याबाबत आदेश जारी केला आहे. यात या अधिकाऱ्यांनी क्रूची अनधिकृत आणि अनियमित तैनाती आणि क्रू विश्रांती नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
या आदेशानंतर एअर इंडियाने एका निवेदन सादर करत म्हटले की, ‘कंपनीने डीजीसीएच्या सूचना स्वीकारल्या आहेत आणि आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एअर इंडियाकडून सुरक्षा प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले जाईल. कंपनीचे सीईओ इंटीग्रेटेड ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (IOCC) वर लक्ष ठेऊन आहेत.’
डीजीसीएने असे म्हटले आहे की, ‘ARMS आणि सीएई फ्लाइट अँड क्रू मॅनेजमेंट सिस्टीमच्या तपासणीनंतर नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.’ दरम्यान, ARMS चे पूर्ण नाव एअर रूट मॅनेजमेंट सिस्टम आहे, जो एक सॉफ्टवेअर आहे. एअरलाइन्स क्रू रोस्टरिंग आणि फ्लाइट प्लॅनिंग इत्यादींसह सर्व ऑपरेशनल आणि मॅनेजमेंट कामांसाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.
DGCA चा एअर इंडियाला इशारा
DGCA ने एअर इंडियाला इशारा देताना म्हटले की, ‘या ऑपरेशनल त्रुटींसाठी थेट जबाबदार असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. हे अधिकारी गंभीर आणि वारंवार होणाऱ्या चुकांमध्ये सहभागी आहेत. क्रू शेड्यूलिंगमध्ये भविष्यात उल्लंघन झाल्यास परवाना रद्द केला जाईल आणि ऑपरेशनल बंदीसह कठोर कारवाई केली जाईल.’
