
डीजिटल इंडियाला आज 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी LinkedIn वर एक ब्लॉग लिहिला आहे. कशा पद्धतीने गेल्या 10 वर्षात भारताने डीजिटल इंडियाचा प्रवास केला आहे, याची माहिती मोदींनी या ब्लॉगमध्ये दिली आहे. या काळात झालेल्या टेक्नॉलॉजीच्या विस्ताराची आणि प्रभावाची चर्चाही मोदींनी या ब्लॉगमध्ये केली आहे. UPI पासून ते AI पर्यंतचा धांडोळा घेताना हा प्रवास करताना आलेल्या अडचणी कशा सोडवल्या गेल्या याची माहितीही त्यांनी दिली आहे.
10 वर्षापूर्वी आम्ही अत्यंत विश्वासाने एका अज्ञात रस्त्यावरून प्रवासाला सुरुवात केली. भारत टेक्नॉलॉजीचा वापर करू शकेल की नाही असा त्या ठिकाणी अनेक दशके संशय घेतला गेला. आम्ही ही मानसिकता बदलली आणि भारतीयांच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला, असं मोदींनी लिहिलं आहे.
टेक्नॉलॉजीने श्रीमंत आणि गरीबांमधील दरी अधिक रुंद करेल असं अनेक दशकांपासून म्हटलं जात होतं. आम्ही ही मानसिकताच बदलून टाकली आणि टेक्नॉलॉजीचा वापर ही दरी भरून काढण्यासाठी केला, असंही त्यांनी म्हटलं.
2014मध्ये इंटरनेटचा वापर मर्यादित होता. डीजिटल लिटरेसी कमी होती. सरकारी सर्व्हिसेसमधील ऑनलाईन अॅक्सेसही मर्यादितच होता. त्यामुळेच भारतासारखा एवढा अवाढव्य देश पूर्णपणे डीजिटल होईल का? याबद्दल संशय होता. आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. हे उत्तर केवळ डेटा आणि डॅशबोर्डमध्ये नाही तर 140 कोटी भारतीयांच्या जीवनात दिसत आहे. 2014मध्ये भारतात 25 कोटी इंटरनेट कनेक्शन होते. आज ही संख्या 97 कोटी झाली आहे. 42 लाख किलोमीटरहून अधिक ऑप्टिकल फायबर केबलंचं जाळं विणण्यात आलं आहे. भारत आणि चंद्रातील अंतराच्या 11 पट अधिक हे ऑप्टिकल फायबर केबलचं जाळं आहे. या ऑप्टिकल फायबर केबलने भारतातील गावंही जोडली गेली आहेत, असं मोदींनी म्हटलंय.
भारतातील 5G सेवा जगातील सर्वात वेगवान सेवा आहेत. केवळ दोन वर्षात 4.81 लाख बेस स्टेशन उभारण्यात आले आहेत. हाय-स्पीड इंटरनेट आता शहरी केंद्रांसह गलवान, सियाचीन आणि लडाख सारख्या लष्करी चौक्यांपर्यंत पोहोचले आहे.
इंडिया स्टॅक, जो आपला डिजिटल कणा आहे, त्याने यू. पी. आय. सारखे मंच शक्य केले आहेत. आता यू. पी. आय. वर दरवर्षी 100 अब्जाहून अधिक व्यवहार होतात. आज जगभरात होणाऱ्या एकूण रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे निम्मे व्यवहार भारतात होतात, अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये ONDC वर भाष्य केलं आहे. हा मंच कशा प्रकारे संधींचे नवे मार्ग उघडत आहे, असं त्यांनी लिहिलं आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबतही त्यांनी भाष्य केले. आधार, कोविन, डिजिलॉकर आणि फास्टॅग यासारख्या सेवा कशा प्रकारे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहेत हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
1.2 अब्ज डॉलर्सच्या इंडिया एआय मिशन अंतर्गत भारताने 34 हजार जीपीयूमध्ये प्रवेश दिला. ही सुविधा लोकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली. आज भारत जगातील टॉप-3 स्टार्टअप इकोसिस्टममध्ये आहे. भारतात 1.8 लाख स्टार्टअप्स आहेत.
पुढील दशक आणखी परिवर्तनशील असेल. आपण डिजिटल प्रशासनापासून जागतिक डिजिटल नेतृत्वाकडे वाटचाल करत आहोत. आपण जगासाठी ‘इंडिया फर्स्ट “वरून’ इंडिया फर्स्ट” कडे वाटचाल करत आहोत. डिजिटल इंडिया हा आता सरकारी कार्यक्रम नसून लोकचळवळ आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.