परदेशी पाहुण्यांसाठी मोदी स्वतः खरेदी करतात का गिफ्ट? जाणून घ्या कुणाच्या खिशातून होतो खर्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा ते विशेष भेटवस्तू नेतात, ज्यामधून भारताची संस्कृती झळकते. पण अनेकांना प्रश्न पडतो, या भेटवस्तूंचा खर्च मोदी स्वतः करतात का? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख सविस्तर वाचा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा ते भारताच्या विविध राज्यांतील खास भेटवस्तू बरोबर नेतात. याला ‘गिफ्ट डिप्लोमेसी’ म्हणतात. यामागचा उद्देश म्हणजे दोन देशांमधील संबंध अधिक घट्ट करणं. नुकतीच 2 ते 9 जुलै दरम्यान पंतप्रधान मोदींनी घाना, त्रिनिदाद अँड टोबैगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया यांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी त्या देशांच्या राष्ट्राध्यक्षांसाठी खास भेटवस्तू घेतल्या होत्या, ज्या भारतीय परंपरेचं प्रतीक होत्या.
मोदींनी या वेळी घानाचे राष्ट्राध्यक्ष यांना कर्नाटकातील बीदर येथील पारंपरिक चांदीच्या जडाईचा फूलदाणी दिला. त्यांच्या पत्नीला त्यांनी चांदीच्या धाग्यांनी सजवलेला पर्स भेट दिला. त्रिनिदाद अँड टोबैगोच्या पंतप्रधानांना चांदीपासून बनवलेली राम मंदिराची प्रतिकृती भेट दिली. अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांना चांदीचा वाघ दिला आणि ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्राची पारंपरिक वारली पेंटिंग भेट दिली. या सर्व भेटवस्तूंमध्ये भारताच्या विविध राज्यांची कला, संस्कृती आणि इतिहासाचं दर्शन घडतं.
मात्र आता लोकांच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न उभा राहतो एवढ्या महागड्या भेटवस्तू मोदी स्वतः त्यांच्या पगारातून घेतात का? मग उत्तर आहे, नाही.
खरं तर, अशा भेटवस्तू देण्यामागे केवळ औपचारिकता नसून दोन्ही देशांमधील मैत्री, सहकार्य आणि संस्कृतीची देवाणघेवाण वाढवण्याचा हेतू असतो. म्हणूनच या भेटवस्तूंची निवड, त्यांचं खरेदीकरण, कोणाला काय द्यायचं याचं नियोजन भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रोटोकॉल डिव्हिजनमार्फत केलं जातं.
एका RTI (माहितीच्या अधिकार कायदा) अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, परदेशी राष्ट्राध्यक्षांना दिल्या जाणाऱ्या या भेटवस्तूंचा खर्च सरकारी बजेटमधून केला जातो. म्हणजेच, यासाठी मोदी स्वतः पैसे देत नाहीत, तर ही एक शासकीय प्रक्रिया असते जी ठरावीक पद्धतीनं पार पडते.
या भेटवस्तू केवळ आकर्षकच नसतात, तर त्या भारताची संस्कृती, कौशल्य आणि इतिहास परदेशात पोहोचवण्याचं माध्यम देखील बनतात. उदाहरणार्थ, चांदीच्या जडाईचा फूलदाणी हे केवळ सौंदर्याचं द्योतक नाही, तर भारतातील हस्तकलेचं एक जिवंत उदाहरण आहे.
एकांदरीत काय ?
पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांवर जाताना जे खास गिफ्ट नेतात, ते त्यांच्याच खिशातून घेतलेली भेटवस्तू नाहीत. हे सर्व नियोजन, खर्च आणि निवड परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रोटोकॉल विभागातर्फे केलं जातं आणि त्यासाठी खर्च सरकारच्याच निधीतून केला जातो. त्यामुळे या भेटवस्तू एक ‘डिप्लोमॅटिक गिफ्टिंग’चा भाग असतात, ज्या दोन देशांमधील मैत्री आणि सहकार्य अधिक बळकट करतात.
