काँग्रेस नेत्यांविरोधातील तपास प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका; ईडीचा ‘हा’ बडा अधिकारी भाजपच्या वाटेवर?

| Updated on: Aug 21, 2021 | 1:59 PM

Rajeshwar Singh | उत्तर प्रदेश पोलीस दलातील राजेश्वर सिंह यांनी 2009 मध्ये प्रतिनियुक्तीवर 'ईडी'मध्ये आले होते. यानंतरच्या काळात राजेश्वर सिंह यांनी एअरटेल मॅक्सिस, टु जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा आणि ऑगस्टा वेस्टलँड अशा महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात प्रमुख भूमिका बजावली होती.

काँग्रेस नेत्यांविरोधातील तपास प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका; ईडीचा हा बडा अधिकारी भाजपच्या वाटेवर?
ईडी
Follow us on

नवी दिल्ली: सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) संयुक्त संचालक राजेश्वर सिंह हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर राजेश्वर सिंह राजकारणात प्रवेश करतील. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

राजेश्वर सिंह हे सध्या ‘ईडी’चे संयुक्त संचालक असून ते लखनऊ येथील विभागीय मुख्यालयात कार्यरत आहेत. राजेश्वर सिंह यांनी बी.टेक आणि सामाजिक न्याय व मानवी अधिकार हा विषय घेऊन पीएचडी केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस दलातील राजेश्वर सिंह यांनी 2009 मध्ये प्रतिनियुक्तीवर ‘ईडी’मध्ये आले होते. यानंतरच्या काळात राजेश्वर सिंह यांनी एअरटेल मॅक्सिस, टु जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा आणि ऑगस्टा वेस्टलँड अशा महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात प्रमुख भूमिका बजावली होती. तसेच पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याविरोधातील भ्रष्टाराच्या प्रकरणाचा तपासही राजेश्वर सिंह यांनी केला होता.


राजेश्वर सिंह यांच्या भगिनी आभा सिंह यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. या ट्विटमध्ये आभा सिंह यांनी म्हटले आहे की, माझ्या भावाचे अभिनंदन. त्याने स्वेच्छानिवृत्ती पत्कारून देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे रहिवासी असलेल्या राजेश्वर सिंह यांना 2015 साली ‘ईडी’मध्ये कायमस्वरुपी सामावून घेण्यात आले होते. राजेश्वर सिंह यांच्यावर अनेक आरोपही झाले होते. 2018 साली केंद्रीय अर्थमंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाकडे एक गोपनीय अहवाल सुपूर्द केला होता. यामध्ये राजेश्वर सिंह यांना दुबईवरून येणाऱ्या फोन कॉल्सचा उल्लेख होता. त्यानंतर ‘ईडी’चे तत्कालीन संचालक कर्नाल सिंह यांना पत्रकारपरिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे लागले होते. याप्रकरणात राजेश्वर सिंह यांची चौकशीही झाली होती. मात्र, त्यामधून राजेश्वर सिंह यांची निर्दोष मुक्तता झाली होती.