
काँग्रेस आमदाराच्या घरी कोट्यवधींची माया आढळल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसचे आमदार केसी वीरेंद्र यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. तसेच इतर ठिकाणीही छापेमारी केली होती. या कारवाईत ईडीने 12 कोटीहून अधिक रोख आणि सोनं चांदी जप्त केलं आहे. यासह एक कोटींहून अधिकचे विदेशी चलन ताब्यात घेतलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही छापेमारी केली होती. अखेर ईडीने शनिवारी केसी वीरेंद्र यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. बंगळुरु ईडीने 22 आणि 23 ऑगस्ट रोजी देशभरात मोठी कारवाई केली. या कारवाईत त्यांनी भक्कम पुरावे हाती लागले. अनधिकृत सट्टेबाजी आणि ऑनलाईन गेमिंग रॅकेट या माध्यमातून त्यांनी उजेडात आणलं आहे. हे प्रकरण कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्याचे आमदार केसी वीरेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांशी निगडीत होते.
ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार केसी वीरेंद्र काही ऑनलाईन बेटिंग साइट्स चालवायचा. यात त्याचा भाऊ केसी थिप्पास्वामी दुबईहून सूत्र हलवत होता. डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज आणि प्राइम 9 टेक्नॉलॉजीज या तीन कंपन्यांमार्फत काळे धंदे करत होता. दुसरा भाऊ के.सी. नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन. राज हे देखील या कामात सहभागी असल्याचे तपासात समोर आलं आहे. छाप्यांदरम्यान ईडीला अनेक महत्त्वाचे कागदपत्रे आणि पुरावेही सापडले आहेत. या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सुरु होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने एकाच वेळी 31 ठिकाणी छापे टाकले होते. गोव्यातही ईडीने पपीज कॅसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कॅसिनो, पपीज कॅसिनो प्राइड, ओशन 7 कॅसिनो आणि बिग डॅडी कॅसिनो या पाच मोठ्या कॅसिनोवर छापे टाकले. ईडीने या छापेमारीतून 12 कोटींची रक्कम जप्त केली आहे. यात 1 कोटी अधिकचे विदेशी चलन आहे. तसेच 6 कोटींचं सोनं आणि 10 किलो चांदी आहे. यात चार लक्झरी गाड्याही आहे. या कारवाईत ईडीने 17 बँक खाती आणि दोन लॉकर गोठवली आहेत.