भूकंप असो की अणुहल्ला…! या घरात तुम्ही राहाल सुरक्षित; एका घराची किंमत किती ते जाणून घ्या
भविष्याचा वेध घेऊन आतापासून अनेक कंपन्या पुढे सरसावल्या आहे. सद्यस्थिती पाहता भविष्यात काय मांडून ठेवलं आहे याची कल्पना नाही. पण सुरक्षिततेसाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अमेरिकेच्या सेफ कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने बंकर संकल्पना प्रत्यक्षात समोर आणली आहे.

जगभरातील तणाव पाहता कधी तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटेल काही सांगता येत नाही. आर्थिक महासत्ता असलेल्या देशांची आडमुठी भूमिका यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यात अण्वस्त्र असलेल्या देशांमुळे हे युद्ध विध्वंसक असेल यात काही शंका नाही. जर असं काही झालं तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीच नष्ट होईल. दुसरीकडे, नैसर्गिक संकटातही जीव वाचवणं कठीण आहे. पण तुम्ही ऐकलं असेल की अशा सर्व स्थितीत बंकर सर्वात सुरक्षित असतात. आता हे बंकर अब्जाधीश असलेल्यांसाठी सुपर लक्झरी सेफ हाऊसमध्ये बदलले जात आहेत. हे बंकर भूमिगत असल्याने अणुहल्ला असो की हवामान बदल याचा कोणताही परिणाम होणार नाही. अशा पद्धतीनेच हे बंकर डिझाईन केले गेले आहेत. या बंकरमध्ये आलिशान रिसॉर्टसारख्या सुविधा असणार आहेत. अमेरिकेतील सेफ या कंपनीने मॉडेल सादर केलं आहे. जगभरातील विविध शहरांमध्ये 1000हून अधिक बंकर तयार केले जात आहे. कंपनीने या प्रकल्पाला एअरी म्हणजेच गरुडाचे घरटे असं नाव दिलं आहे.
लक्झरी बंकर सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम असेल. तसेच चांगलं जेवण आणि पिण्याची व्यवस्था असणार आहे. इतकंच काय लक्झरी बंकरमध्ये स्पाची देखील सुविधा असणार आहे. सेफ कंपनीचे ऑपरेशन्स आणि मेडिकल प्रीव्हेंशन डायरेक्टर नाओमी कॉर्बी यांनी बीबीसी न्यूज ब्राझीलशी बोलताना या बाबतचा खुलासा केला. या बंकरची किंमत त्याच्या आकारावर अवलंबून असणार आहे. 184 चौरस मीटर बंकरची किंमत जवळपास 18 कोटी रुपये असेल. तर मोठ्या बंकरची किंमत 180 कोटी असू शकते. कंपनीचा दावा आहे की, या बंकरमध्ये पाणी, अन्न, वीज आणि वैद्यकीय सुविधांची उणीव भासणार नाही. ते स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण असतील.
मेटा कंपनीचे मालक मार्क झुकबर्ग यांनी काही वर्षांपूर्वी असाचा प्रकल्पाची घोषणा केली होती. दुसरीकडे, अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी या दृष्टीने गुंतवणूक सुरु केली आहे. भविष्याच्या दृष्टीने अब्जाधीशांनी आतापासून सुरक्षित घरांकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या काही महिन्यात या घरांची मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे या बंकरमध्ये एक तुरुंग असेल. एखाद्या सदस्याने काही चूक केली तर त्याला तिथेच ताब्यात ठेवता येईल. कॉर्बी म्हणाले की, हे तुरुंग अत्याधुनिक डिटेंशन सेंटरसारखं असेल.
